उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एका स्थानिक कोर्टामध्ये सुनावणीसाठी आलेल्या हत्येच्या आरोपींवर भर कोर्टातच चार अज्ञात गुंडांनी गोळीबार केला. यामध्ये मुख्य आरोपी शाहनवाज याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही गोळी लागली आहे. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांना देखील घटनास्थळावरुन पळ काढावा लागला. यानंतर पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात नाकाबंदी केली आहे.

याच वर्षी २८ मे रोजी नजीबाबादमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कार्यालयात प्रॉपर्टी डिलर हाजी अहसान आणि त्याचा भाचा शादाब यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दानिश या आरोपीला मुंबईतून तर जब्बार आणि शाहनवाज यांना दिल्लीतून पकडले होते. दरम्यान, मंगळवारी बिजनौरच्या कोर्टात जब्बार आणि शाहनवाज यांना पोलिसांच्या बंदोबस्तात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी कोर्टाच्या परिसरात आधीच लपून बसलेल्या तीन शार्प शूटर्सने अंधाधुंद गोळीबार सुरु केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. यावेळी वकिलांनी तीन आरोपींना पकडून ठेवले. तसेच सुमारे २० गोळ्या झाडण्यात आल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, हाजी अहसानचा मुलगा साहिल आणि त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला घडवून आणला. पोलिसांनी त्यांना अटक केली असून हल्ल्यात शाहनवाजचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जब्बार पळून जाण्यात यशस्वी ठरला. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.