पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ विनाकारण तणावाची स्थिती निर्माण करणारा चीन आता उलटा भारतालाच परिस्थिती आणखी खराब न करण्याचे सल्ले देत आहे. वरिष्ठ लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. पण चीनने बैठकीमध्ये ठरलेल्या गोष्टींचे पालन केलेले नाही. त्यामुळे सीमेवरील तणाव अजून कमी होऊ शकलेला नाही. त्यात चीन आता उलटे भारतालाच सल्ले देत आहे.

नियंत्रण रेषेवरील पेच इतक्यात सुटणार नाही, भारताने दीर्घ संघर्षाची तयारी करुन ठेवली आहे, यासंबंधी प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर चिनी दूतावासाकडून प्रतिक्रिया आली आहे. “भारत आणि चीन पुन्हा चर्चा करु शकतात तसेच परिस्थिती आणखी जटिल होईल अशी कोणतीही कृती भारताने करु नये” असे चीनने म्हटले आहे.

चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने बुधवारी रात्री उशिरा टि्वट केले. “सीमेवरील स्थिती आणखी जटिल, अडचणीची होईल अशी कोणतीही कृती भारत करणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे झाले तर, सीमाभागात शांतता आणि स्थिरतेसाठी अनुकूल वातावरण तयार होईल. द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी सुद्धा ते चांगले राहिलं” असे चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु आहे. एकंदर सीमेवरील परिस्थिती स्थिर असून तणाव कमी होत आहे असे चिनी अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. पण या संपूर्ण वादावर अजून तोडगा निघू शकलेला नाही.

पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्य दीर्घकाळ तैनातीच्या दृष्टीने तयारी करत आहे, अशा बातम्या सरकारी सूत्रांच्या हवाल्याने भारतीय माध्यमांमध्ये येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चिनी दूतावासाकडून हे टि्वट करण्यात आले आहे. पँगाँग टीएसओ आणि देपसांग या भागातून चिनी सैन्य अजूनही मागे हटलेलं नाही. त्यामुळे तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. चीन एकाबाजूला चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दाखवत आहे. पण तेच दुसऱ्या बाजूला सीमेवर फायटर जेट्स, रणगाडे आणि सैन्याची तैनाती वाढवत आहे.