अरूणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. त्यानंतर देशभरातील राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सर्वोच्च न्यालयाच्या या निर्णयानंतर तरी मोदीजी लोकाशाहीचा आदर करतील असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे. मोदींना संविधान आणि जनादेश या दोन्ही गोष्टींवर विश्वास नाही. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे हा देश चालवायचा आहे असाही आरोप केजरीवालांनी केलाय. आधी उत्तराखंड आणि आता अरूणाचल प्रदेश अशा दोन्ही ठिकाणीची राष्ट्रपती राजवट रद्द करून न्यायालयानं मोदी सरकारला दोनदा चपराक लगावली आहे, त्यामुळे या प्रकरणातून धडा घेऊन मोदीजी आतातरी दिल्ली सरकारला त्यांच्या मार्गाने काम करू देतील अशी प्रतिक्रियाही केजरीवाल यांनी दिली आहे.