लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ब्रिटनमध्ये घडली. लग्नानंतर काही तासांत झोपेदरम्यान तिचा मृत्यू झाला. आपली पत्नी या जगात नसल्याचे सकाळी उठल्यावर तिच्या नवऱ्याला कळले. ३८ वर्षीय मॅरिओला मिखालोवस्की आणि ३४ वर्षीय क्रिजस्टॉफ लग्नबंधनात अडकले होते. उत्तर यॉर्कशायरमध्ये संपन्न झालेल्या छोटेखानी समारंभात दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले. या आनंदाच्या क्षणी मॅरिओलाच्या मृत्यूने क्रिजस्टॉफवर दुःखाचा डोंगर कोसळला.
गेल्या सहा वर्षांपासून हे दोघे एकत्र राहात होते. मॅरिओलाला आकडी येत असे. गेल्या २० वर्षांपासून ती या त्रासाशी लढा देत असल्याचे क्रिजस्टॉफने सांगितले. दिवसातून चार ते पाचवेळा तिला हा त्रास होत असे. लग्नानंतर दोघेही आपल्या दोन चिमुकल्यांसोबत झोपले होते. बायको झोपली असल्याचे समजून रात्री छोट्या मुलीला काही खायला देण्यासाठी क्रिजस्टॉफ उठला होता. सकाळी उठल्यावर क्रिजस्टॉफने मॅरिओलाला उठविण्याचा प्रयत्न केला असता तिचा श्वास चालू नसल्याचे त्याच्या लक्षात आले. क्रिजस्टॉफने लगेचच तिला सीपीआर दिला आणि फोन करून रुग्णवाहिका बोलावली. वैद्यकीय चमू घटनास्थळी दाखल झाला असता त्यांनी मॅरिओलाला मृत घोषित केले.