घरच्यांचा विरोध डावलून प्रेम करणाऱ्या आपल्याच मुलीसह तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रोहतक जिल्हय़ात उघडकीस आली आहे. पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह तिघांना गुरुवारी अटक केली. तसेच या प्रकरणी पोलीस अन्य तिघांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये मुलीचे वडील रविंदर, आई रीटा आणि काका निरदर यांचा समावेश आहे. तर फरार असलेल्या मुलीचा भाऊ, त्याचा मित्र आणि गाडीचालक यांचा शोध सुरू असल्याची माहिती रोहतकचे पोलीस महासंचालक अनिल राव यांनी दिली.
रोहतक जिल्हय़ातील कलानौर भागातील घरनावटी गावात राहणाऱ्या निधी बारक (२०) आणि धरमेंदर बारक (२३) यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही एकाच गावात राहणारे आणि जाट समुदायाचे होते. निधी ही ललित कला शाखेची तर धरमेंदर हा आयटीआयचे शिक्षण घेत होता. मात्र खाप पंचायतीच्या नियमानुसार एकाच गावात राहणाऱ्या आणि एकाच समुदायाच्या व्यक्तींना लग्न करण्यास मनाई आहे. मंगळवारी दोघेही आपापल्या घराबाहेर पडले होते. मात्र पुन्हा घरी परतलेच नाहीत.
 बुधवारी त्यांचे मृतदेह आढळून आले. निधीच्या आई-वडिलांनी आणि अन्य नातेवाईकांनी तिचा प्रियकर धरमेंदर याला बुधवारी बेदम मारहाण करून त्याचा गळा कापून मृतदेह फेकून दिला आणि त्यानंतर मुलीचीही हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला
आहे.
या दोघांच्या प्रेमप्रकरणाला मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता. त्यातूनच या प्रेमिकांची अत्यंत थंड डोक्याने हत्या करण्यात आल्याचे राव यांनी सांगितले. या हत्या प्रकरणात वापरलेले शस्त्र अद्याप सापडले नसल्याचेही त्यांनी सांगितले.