करोनाचा उद्रेक झालेल्या भागांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन नजर ठेवून असतं. रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांसाठी क्वारंटाइनही केलं जात आहे. पण, देशात पहिल्यांदाच रेड झोनमधून आलेल्या पाळीव प्राण्याला क्वारंटाइन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रशासनानं एका घोड्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं आहे.

करोनाच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी देशात वेगवेगळ्या उपाययोजना अवलंबल्या जात आहे. विशेषतः करोनाच्या प्रसाराला आळा बसावा म्हणूल लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळून येत आहे. जम्मू काश्मीरमध्येही करोनाचा प्रसार रोखण्यासाठी काम केलं जात असून, धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून टोकाचे निर्णयही घेतले जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात एका घोड्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मालकाचा रिपोर्ट येईपर्यंत अश्वाला क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं तहसीलदारांनी सांगितलं.

मंगळवारी एक व्यक्ती घोड्यासह काश्मीरमधून राजौरी जिल्ह्यात परतली. रेड झोनमधून आलेल्या त्या व्यक्तीची मुघल रोड येथे चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट अजून आला नाही. मात्र, त्या व्यक्तीला १४ दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, त्या व्यक्तीसोबत असलेल्या घोड्यामुळे करोनाचा प्रसार होऊ शकतो. म्हणून प्रशासनानं पशु वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांना बोलावलं. अधिकाऱ्यांनी घोड्यामुळे करोनाचा प्रसार होण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त केली.

“घोड्याच्या चाचणीविषयी आम्ही पशु वैद्यकीय विभागाच्या तज्ज्ञांना बोलावलं. त्यांनी घोड्याच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली. घोड्याला त्याच्या मालकाकडे सोपवण्यात आलं असून, प्रवासासाठी घोड्याचा वापर न करण्याची सूचना आम्ही मालकाला दिली आहे. त्याचबरोबर कोणतीही खबरदारी न घेता घोड्याजवळ न जाण्याचंही सांगितलं आहे. त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. या काळात पशु वैद्यकीय अधिकारी घोड्याची ठरविक काळानं तपासणी करणार आहेत,” अशी माहिती राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त शेर सिंग यांनी ‘आउटलूक’शी बोलताना दिली.