राजस्थानात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी घोडेबाजाराचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यंत्री सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या २४ आमदारांनी केला आहे. आम्ही त्यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही असं या आमदारांनी एका संयुक्त स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल झाला असून भाजपाच्या दोन नेत्यांना अटकही झाली आहे. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी रात्री जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सध्या करोनाशी लढण्यावर आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवं आणि आम्ही तेच करीत आहोत. मात्र, भाजपाकडून आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं वाजपेयींच्या काळात नव्हतं. मात्र, सन २०१४ नंतर धर्मावर आधारित फूट पाडण्यात गर्व मानला जात आहे. करोनाच्या या संकट काळात भाजापाच्या नेत्यांनी मानवता धाब्यावर बसवली आहे. हे लोक सरकार पाडण्यासाठी आमदारांची खरेदी कशी करावी या कामात गुंतले आहेत.” भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, विरोधी पक्ष नेते गुलाबचंद कटारिया आणि उपनेता राजेंद्र राठोड यांचं नाव घेऊन हे लोक त्यांच्या केंद्रीय नेत्यांच्या इशाऱ्यावर कशा प्रकारे खेळ खेळत आहेत हे आता जनतेसमोर आलं आहे, असंही गेहलोत यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे गहलोत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले, “राजस्थानचे मुख्यंमत्री अशोक गेहलोत हे एक हुशार राजकीय नेते आहेत. आपल्या सरकारच्या अपयशाचं खापर ते भाजपावर फोडत आहेत. त्यांच्या कुठल्याही आरोपांना आधार नाही. त्यांच्याजवळ संख्याबळ आहे. त्यांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कोण करेल.”

दरम्यान, या प्रकरणी एफआयआरही दाखल करणात आला असून फिर्यादी असलेल्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) सांगितलं की, “हत्यारांच्या तस्करीप्रकरणी दोन मोबाईल क्रमांकांवर एसओजीकडून पाळत ठेवण्यात येत होती. या क्रमांकावरुन झालेल्या चर्चेतून समोर आलं की, राज्यसभा निवडणुकीच्यापूर्वी राजस्थानातील सरकार पाडण्याचा डाव रचला गेला होता. आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपये देण्याची माहिती या संभाषणातून समोर आली आहे.” सरकारचे मुख्य व्हीप महेश जोशी यांनी केलेल्या आरोपांची तपासणी केल्यानंतर एसओजीने हा दावा केला आहे, अमर उजालाने आपल्या वृत्तात याचा उल्लेख केला आहे.

या एफआयआरमध्ये बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगढमधून एक महिला आमदार रमीला खडिया आणि बांसवाडा जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार महेंद्रजीत सिंह मालवीय यांची नावं देखील समोर आली आहेत. या दोघांना विरोधी पक्षाकडून मोठ्या रकमेची लाच देण्यात आली होती. दरम्यान, हे प्रकरणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर जोशी यांनी राज्यसभा निवडणुकीच्या आधी एक लिखित अहवाल एसओजीकडे सुपूर्द केला होता.

कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे भाजपा नेत्यांना अटक

आजतकच्या वृत्तानुसार, आमदारांच्या खरेदीप्रकरणात ब्यावर येथील दोन भाजपा नेते भरत मलानी आणि अशोक सिंह यांची नावं समोर आली आहेत. या दोघांना ब्यावर उदयपूर येथून स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली. एसओजीच्या माहितीनुसार मालानी यांच्या कॉल रेकॉर्डवरुन हे उघड झालं आहे की, आमदारांचा घोडेबाजाराचा प्रयत्न केला जात होता. भरत मलानी यांनी भाजपामध्ये अनेक पदांची जबाबदारी सांभाळली आहे.