बगदाद : इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून ८२ जण ठार तर इतर ११० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती इराकच्या अंतर्गत कामकाज मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी रात्री ही आग लागली होती ती विझवण्यात यश आले. सुरुवातीच्या माहितीनुसार प्राणवायूच्या टाकीचा स्फोट इब्ह अल खतीब रुग्णालयाच्या एका वॉर्डमध्ये झाला. इराकच्या पंतप्रधानांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांची या घटनेनंतर पदावरून हकालपट्टी केली आहे. मृतांमध्ये श्वासनयंत्रणेवर असलेल्या २८ रुग्णांचा समावेश होता. ते सर्व कोविड संसर्ग असलेले रुग्ण होते.
अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आले, तेव्हा त्यांना दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचण्यात प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. नागरी सुरक्षा दलांची पथके तेथे आली होती. सकाळपर्यंत आग विझवण्यात यश आले. रुग्णवाहिकांनी जखमींना उपचारार्थ नेले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोनशे जणांची यातून सुटका करण्यात आली.
आगीच्या घटनेनंतर पंतप्रधान मुस्तफा अल खादिमी यांनी बगदाद आरोग्य खात्याच्या महासंचालकांना पदावरून काढून टाकले. त्यांनी इब्ह अल खतीब रुग्णालयाचे संचालक व अभियांत्रिकी व निगा संचालक यांनाही पदावरून काढून टाकले. खादिमी यांनी आपत्कालीन बैठक घेतली. बगदाद ऑपरेशन कमांड सुरक्षा दलांना मदत करीत आहे.

कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाला असून त्याला तेच जबाबदार आहेत. त्याची जबाबदारी निश्चिात केली पाहिजे. चोवीस तासांत चौकशीचा अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इराकमधील राजदूत जिनी हेनीस प्लासशर्ट यांनी या घटनेबाबत दुङ्मख व्यक्त केले असून रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त सुरक्षितता असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.