हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासधूस कमी व्हावी या दृष्टीने केंद्र सरकार काही ठोस पावले उचलणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबतची माहिती एनडीटीव्हीला दिली आहे. आपल्या देशामध्ये हॉटेलमधून अन्नाची मोठ्या प्रमाणात नासधूस होती. ज्या देशात लाखो लोक उपाशी राहतात त्या देशात अन्नाची नासधूस करणे हे पाप आहे असे पासवान यांनी म्हटले. ही अन्नाीची नासधूस थांबावी म्हणून हॉटेल व्यवसायायिकांसोबत एक बैठक घेतली जाणार आहे. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अन्नाचे प्रमाण किती असावे हे ठरवले जाणार आहे असे ते म्हणाले.

जेवण मागवण्यापूर्वी ग्राहकाला कल्पना असायला हवी की आपण जी डिश मागवत आहोत ती नेमकी किती येते. त्यानुसार तो ऑर्डर देऊ शकतो. त्यामुळे ग्राहकाचे पैसे वाया जाणार नाही तसेच अन्नही वाया जाणार नाही असे पासवान यांनी म्हटले. अन्नाची नासाडी टाळायची असेल तर काही पावले उचलणे अत्यावश्यक आहे असे ते म्हणाले. या नियमांमुळे हॉटेलवर नियम लादले जाणार नाही का असे त्यांना विचारण्यात आले. ते म्हणाले आम्ही नियंत्रण करत नसून ग्राहकांच्या हितासाठी केवळ त्याचे प्रमाण ठरवत आहोत असे पासवान म्हणाले. तसेच प्रत्येक हॉटेलमध्ये हाफ किंवा क्वार्टर प्लेट मागवता येईल याबदद्लही विचार सुरू आहे.

याआधी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामधून सातत्याने वाया जाणाऱ्या अन्नाबाबत चिंता व्यक्त केली होती. हा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानुसारच पासवान पावले उचलत आहेत असे म्हटले जात आहे. हे नियंत्रण केवळ मोठ्या हॉटेलमध्येच असणार आहे. ज्याठिकाणी थाळी किंवा बफे सर्व्ह केले जाते तिथे हे नियंत्रण नसेल.