जॉन ऑलिव्हर यांच्या ‘लास्ट वीक टुनाइट’ या लोकप्रिय टॉक शोचा ताजा भाग (एपिसोड) डिस्नेच्या मालकीच्या हॉटस्टारने अपलोड केलेला नाही. या भागात ऑलिव्हर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत, तसेच त्यावरून उसळलेला हिंसाचार हाताळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर टीका केली होती.

‘मोदी : लास्ट वीक टुनाइट विथ जॉन ऑलिव्हर’ हा ताजा भाग हॉटस्टारच्या वापरकर्त्यांना मंगळवारी सकाळी ६ वाजेपासून उपलब्ध होणे अपेक्षित होते; मात्र मंगळवारी आपल्या अ‍ॅपवर लॉग-इन करणाऱ्यांना गेल्या आठवडय़ातील भागच पाहायला मिळाला. याबाबत केलेल्या विचारणेला डिस्ने व हॉटस्टार यांनी प्रतिसाद दिला नाही; तर सरकारचे या विषयाशी काही देणेघेणे नाही, असे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

३० मिनिटांच्या या भागाची १८ मिनिटांची चित्रफीत या शोच्या अधिकृत यूटय़ूब चॅनेलवर मंगळवारी अपलोड करण्यात आली असून, तेव्हापासून ५० लाखांहून अधिक लोकांनी ती पाहिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट दिल्यामुळे ऑलिव्हरने हा भाग भारतावर केंद्रित करण्याचे ठरवले. ईशान्य दिल्लीत हिंसाचार उफाळला असतानाच ही ३६ तासांची भेट पार पडली होती.