करोनाची लागण झालेल्या आईची आठवडाभरापासून मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर गुरुवारी पहाटे साडे तीन वाजता संपली. रुग्णालयातील आयसीयूमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहा तासांनतर डॉक्टर असणारी त्यांची मुलगी शिल्पा पटेल कामावर हजर झाली होती. वडोदरामधील सरकारी एसएसजी रुग्णालायत कार्यरत असणाऱ्या शिल्पा पटेल कर्तव्यासाठी उपस्थित होत्या. तर दुसऱ्या एका शहरात ६७ वर्षीय आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलगा डॉक्टर राहुल परमारही रुग्णालयात हजर झाला होता.

आईच्या जाण्याने खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतानाही शिल्पा आणि राहुल करोना रुग्णांच्या सेवेसाठी हजर झाले होते. डॉक्टर शिल्पा पटेल यांनी आपल्या ७७ वर्षीय आई कांता अंबालाल पटेल यांच्या अंत्यसंस्कार केले आणि पीपीई सूट घालून पुन्हा करोना रुग्णांवरील उपचार सुरु केले.

आणखी वाचा- रुग्णवाढीबरोबर मृत्यूचं तांडव! २४ तासांत १.७६१ रुग्णांचा मृत्यू

डॉक्टर राहुल परमारची आई कांता परमार यांचं वृद्धापकाळाने गांधीनगरमधील रुग्णालयात निधन झालं. राहुल परमान कोविड मॅनेजमेंटसाठी नोडल अधिकारी म्हणून काम करत असून एका मोठ्या रुग्णालयातील मृतदेह विल्हेवाट लावणाऱ्या टीमचा भाग आहेत. आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.

“तो नैसर्गिक मृत्यू होता. मी कुटुंबासोबत अंत्यविधी उरकले आणि पुन्हा वडोदराला आलो,” असं राहुल परमार यांनी सांगितलं. करोनाच्या या संकटात पहिल्या फळीतील योद्धे असणारे डॉक्टर पहिल्या दिवसापासून जीवाची बाजी लावून काम करत आहेत. अशावेळी डॉक्टर शिल्पा आणि राहुल यांनी दाखवलेली बांधिलकी कौतुकास्पद असल्याचं डॉक्टर विनोद राव यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- Corona: प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट

राहुल परमार यांना एका वर्षापूर्वी करोनाची लागणही झाली होती. पाच दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होता. रेमडेसिवीर आणि १४ दिवसांच्या विलगीकरणानंतर ते पुन्हा कामावर हजर झाले होते अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.