स्वयंपाकघरातल्या गृहिणींसाठी आणि नोकरदारांसाठी एक आनंदाची घोषणा आज संध्याकाळी केंद्र सरकारतर्फे करण्यात आली. देशभरात सर्व कुटुंबाना वर्षभरात फक्त सहा सिलेंडर्स देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. सहा पुढील प्रत्येक सिलेंडर बाजारभावाने विकत घ्यावं लागेल, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, अनुदानित गॅस सिलेंडर्सची मर्यादा सहावरून नऊपर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी आज (मंगळवार) केली. नवीन वर्षापासून म्हणजेच २०१३ पासून कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर वाढीव सिलेंडर्स देण्याच्या योजनेला सुरूवात होईल, असं मोईली म्हणाले. या आधी ही मर्यादा वर्षभरात सवलतीतील सहा सिलेंडर्सपर्यंतच मर्यादीत ठेवण्यात आली होती.
अनुदानिक सिलेंडर्सला मर्यादा घालण्याच्या निर्णयावर देशभरातून टीका झाली होती. पेट्रोलियम कंपन्यांना होणारा तोटा, सबसिडीच्या रूपात सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता, केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील वर्षापासून अनुदानित सिलिंडरबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.   
सर्वसामान्य नागरिकांचा रोष लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने काँग्रेस शासित राज्यांमध्ये अनुदानित सिलेंडर्सची संख्या सहावरून नऊ पर्यंत वाढविण्याचा सल्ला राज्य सरकारांना दिला होता. वर्षभरातील अतिरिक्त तीन सिलेंडरच्या अनुदानाचा खर्च राज्य सरकारांनी आपल्या तिजोरीतून उचलावा, असंही काँग्रेसकडून काँग्रेसशासित राज्य सरकारांच्या मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं होतं.