दुबई : इराणशी हातमिळवणी केलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी मंगळवारी बॉम्बसह सौदी विमानतळ व लष्करी तळावर हल्ला केला. सौदी अरेबियाने असा हल्ला झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असून मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाची स्थिती आता आणखी चिघळली आहे. इराण व अमेरिका  यांच्यातील संघर्ष विकोपाला गेलेला असतानाच आता या घटनेने त्यात भर पडली आहे.

सौदी अरेबियातील नाजरान भागात हा हल्ला  झाला. दरम्यान इराणने युरेनियम शुद्धीकरणाचा वेग वाढवल्याचे म्हटले असून त्याचा वेग अजूनही अणुबॉम्ब निर्मितीसाठी लागणाऱ्या वेगापेक्षा कमीच आहे. अमेरिकेने इराणशी २०१५ मध्ये अणुकरार केला होता त्यातून ट्रम्प प्रशासनाने माघार घेतली आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणविरोधात आर्थिक युद्ध छेडले असून त्याला तोंड देण्यासाठी अध्यक्ष हासन रूहानी यांनी कार्यकारी अधिकार वाढवून घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

व्यक्ती किंवा देश दडपणाखाली येऊ शकतो पण आम्ही कुणाच्या टगेगिरीपुढे झुकणार नाही असे रूहानी यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितले.

युरेनियम शुद्धीकरणाचा वेग वाढवून त्याचा साठा करण्याचा इराणचा प्रयत्न असून हा साठा लवकरच अणुकरारात ठरवून दिलेली मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. इराणने युरोपीय समुदायाला नवीन अणुकराराच्या अटी ठरवण्यासाठी ७ जुलैची मुदत दिली आहे. तसे केले नाही तर युरेनियम शुद्धीकरणाचा वेग वाढवून अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता गाठली जाईल अशी धमकी इराणने दिली आहे. दरम्यान अमेरिकेने पर्शियन आखातात युद्धनौका व बॉम्बफेकी बी ५२ विमाने पाठवली आहेत.

आताच्या ड्रोन हल्ल्याबाबत हुथींच्या अल मसिराह उपग्रह वृत्त वाहिनीने म्हटले आहे की, त्यांनी नाजरान विमानतळावर कासेफ २ के ड्रोनच्या मदतीने हल्ला केला असून शस्त्रागाराला लक्ष्य केले आहे. नाजरान हे ठिकाण रियाधपासून ५२५ मैल अंतरावर सौदी येमेन सीमेवर आहे. तेथे हुथींनी अनेकदा हल्ले केले आहेत. सौदी अरेबियाच्या आघाडीचे प्रवक्ते कर्नल तुर्की अल मलिकी यांनी सांगितले की, हुथी बंडखोरांनी नागरी ठिकाणावर हल्ले केले आहेत. हुथी हे इराणचे दहशतवादीच आहेत असा आरोप त्यांनी केला.