येमेनमध्ये करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यात किमान ८० सैनिक ठार झाले असून हा हल्ला हुथी बंडखोरांनी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारिब भागात  एका मशिदीवर हा हल्ला करण्यात आल्याचे वैद्यकीय व लष्करी सूत्रांनी म्हटले आहे.

इराण समर्थित हुथी व येमेनमधील आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सौदी प्रणीत लष्करी आघाडीचा पाठिंबा असलेले सरकार यांच्यातील संघर्ष गेले काही महिने बंद होता, पण त्यानंतर आता पुन्हा शनिवारी हल्ला झाला आहे. हुथी बंडखोरांनी सना या राजधानीच्या पूर्वेला १७० कि.मी. अंतरावर असलेल्या लष्करी छावणीतील मशिदीवर हा हल्ला केला.  त्या वेळी सायंकाळचा नमाज सुरू होता. वैद्यकीय सूत्रांनी सांगितले, की मारिब शहर रुग्णालयाच्या माहितीनुसार एकूण ८० सैनिक ठार तर ५० जण जखमी झाले आहेत. सौदी आघाडीचे समर्थन असलेल्या सरकारी दलांनी नहाम भागात हुथी बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे.

नहाम येथे रविवारीही धुमश्चक्री सुरू होती. त्यात काही हुथी बंडखोर ठार झाले आहेत.