काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारलेली मिठी विशेष प्रभावी ठरली नाही असेच मोदींच्या भाषणावरून दिसून आले. विश्वासदर्शक ठरवासाठी मतदान घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसची चांगली खरडपट्टी काढली असचं म्हटल्यावर वावगं ठरणार नाही. राहुल गांधींनी केलेल्या भाषणातील प्रत्येक मुद्द्याला हात घालत त्याच्या उत्तराला मोदींनी प्रत्युत्तर दिलेच. मात्र त्याबरोबरच पुरेसे संख्याबळ नसताना अविश्वास ठरावं आणणारे विरोधीपक्ष, राहुल गांधी, काँग्रेस आणि सोनिया गांधी या सर्वांचाच समाचार मोदींनी घेतला.

सकाळी मतदानही झाले नव्हते, चर्चाही संपली नव्हती तेव्हा लोकसभेतील एक सदस्य माझ्या खुर्ची जवळ आला आणि म्हणू लागला उठा उठा उठा… सत्तेत येण्याची एवढी घाई का. मला या सदस्याला एक गोष्ट सांगाविशी वाटतेय की आम्हाला लोकांनी निवडणून दिले आहे. त्यामुळेच आम्ही आज इथे आहोत, असे सांगताना राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदींनी त्यांना सुनावले.

सकाळी राहुल गांधी भाषणानंतर मोदींनी मिठी मारण्यासाठी त्यांच्या खुर्ची जवळ गेले आणि त्यांना उठून उभे राहण्यास सांगत होते. मात्र मोदींनी जागेवरून उठण्यास नकार दिल्याने त्यांनी मोदींना बसल्या जागीच मिठी मारली. हाच धागा पकडून मोदींनी ही टिका केली.

दुपारच्या सुमारास राहुल गांधी यांनी भाषण संपल्यानंतर अचानक मोदी बसतात तिथे जाऊन त्यांना मिठी मारली. मात्र मोदी जागेवरुनही उठले नाही. त्यामुळेच बसलेल्या मोदींनाच राहुल यांनी आलिंगन दिले. राहुल गांधी मिठी मारल्यानंतर पुन्हा आपल्या जागेच्या दिशेने जाऊ लागले असता मोदींनी त्यांच्या हाताला पकडून त्यांना परत बोलवले, त्यांच्या कानात ते काहीतरी बोलले आणि त्यांनी राहुल यांच्या पाठीवर शब्बासकीसारखी थाप मारली.

मात्र ही मिठी मारण्याच्या काही मिनिटेआधीच राहुल गांधीने मोदी माझ्या नजरेला नजर मिळवू शकतं नाहीत. ते सध्या उसणं हसत असून त्यातून त्यांची अस्वस्थता दिसून येत असल्याची टिका केली होती. मोदींनी रात्री नऊनंतर संसदेमध्ये अविश्वास ठरावावारून दिवसभर झालेल्या चर्चेबद्दल आणि त्या चर्चेत करण्यात आलेल्या आरोपांवर आपले मत मांडले. त्याचवेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या या डोळ्यात डोळे घालून बोलण्याच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. तुमच्या डोळ्यांत डोळे घालून बोलणार मी कोण. मी गरीब कुटुंबातील आहे. तुम्ही नामदार आहात आम्ही कामदार आहोत. तुमच्या डोळ्याला डोळे भिडवायची माझी लायकी नाही. तुमच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत आमच्यात नाही असा खोचक टोमणा मोदींनी लगावला.

काँग्रेस पक्ष कायमच आरेरावी आणि दुसऱ्यावर हुकूमत गाजवणारा पक्ष असल्याचा मुद्दा मोदींना या टिकेमधून अधोरेखित करायचा होता. म्हणूनच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणाऱ्यांच काय झालं पाहा. त्यांचा अपमान झाला. चरण सिंग, सरदार पटेल, मोरारजी देसाई, चंद्र शेखर, शरद पवार…’ काँग्रेसच्या दादगिरीचाच मुद्दा पकडून पुढे बोलताना मोदींनी सोनिया गांधींनाही सुनावले. मोदींनी सोनियांना १९९९ साली काँग्रेसने अटलबिहारी वाजपेय यांच्या सरकारविरोधी अविश्वास ठराव आणला होता तेव्हाच्या एका प्रसंगाची आठवण करुन दिली. त्यावेळी सोनिया गांधीनी आरेरावी करत, ‘आम्ही २७२ (खासदार) आहोत आणि आणखीन येत आहेत’ असे वक्तव्य केल्याची निदर्शास आणून दिले. त्याचप्रमाणे वर्तमानाचा दाखला देतही मोदींनी सोनियांच्या आरेरावीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, ‘मी आजच्या वृत्तपत्रांमध्ये तुमचे वक्तव्य वाचले, ‘कोणं म्हणतयं आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीय?’ असं वक्तव्य करण्याइतकी आरेरावी कशाला?’ असा प्रश्न मोदींनी संसदेत काँग्रेस पक्षाला केला.

याशिवाय पंतप्रधान मोदींने राहुल गांधीने केलेल्या ‘सर्जिकल स्टाइक नाही जुमला स्ट्राइक’ आणि ‘चौकीदार नाही तर भागीदार’ या वक्तव्यांवरूनही सडेतोड उत्तर दिले. हो मी भागीदार आहे पण तुमच्यासारखा ठेकेदार नाही असं म्हणत त्यांनी गांधींना राफेल करारावरून डिवचले. राफेल करारावरून राहुल गांधीनी केलेल्या धक्कादायक आरोपांबद्दल बोलताना बेताल वक्तव्य टाळण्याचा सल्ला मोदींनी राहुल यांना दिला. संवेदनशील विषयांवर लहान मुलांसारखी वक्तव्य करणे टाळायला हवे. दोन देशांमधील सरकारने हा करार केला होता. राफेलसारख्या संवेदनशील विषयावर लोकसभेत केलेल्या एका अविचारी वक्तव्यामुळे दोन्ही देशांना यासंदर्भातील औपचारिक स्पष्टिकरण जाहीर करावं लागल्याचंही मोदींनी सांगितले.

मोदींच्या दीड तासाच्या भाषणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच झालेल्या अविश्वास ठरवावरील मतदानामध्ये लोकसभेने मोदी सरकारला पाठिंबा दिल्याचे दिसून आले. ३२५ विरुद्ध १२६ मतांनी मोदी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि विरोधक पुन्हा एकदा मोदींसमोर नापास झाले. एकूण उपस्थित ४५१ सभासदांपैकी ३२५ जणांनी मोदी सरकारच्या बाजूने तर १२६ जणांनी सरकारच्या विरोधात मदतान केले. बहुमत सिद्ध करण्यासाठी २२६ हून अधिक जणांच्या पाठिंब्याची गजर असते. मोदी सरकारने हा आकडा अगदी सहज पार केल्याचे या मतदानात दिसून आले.