पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला असतानाच आता काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. घराणेशाही प्रत्येक क्षेत्रातच आहे.  एखाद्या पक्षात जर घराणेशाही सुरु असेल तर त्या व्यक्तीचे योगदान पक्ष आणि मतदार लक्षात घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर ब्लॉगद्वारे टीका केली होती. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करताना मोदींनी म्हटले होते की, देशातील घटनात्मक संस्था काँग्रेसच्या घराणेशाहीच्या बळी पडल्या. माध्यमांपासून संसदेपर्यंत, जवानांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत, संविधानापासून कोर्टापर्यंत काहीही काँग्रेसच्या राजकारणापासून सुटलेले नाही, या घटनात्मक संस्थांचा अपमान करणे ही काँग्रेसची पद्धत आहे, असे त्यांनी म्हटले होते.

नरेंद्र मोदींच्या या टीकेवर काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी प्रत्युत्तर दिले. मोदींनी काँग्रेसवर यासाठी आरोप केला कारण त्यांना राजकीय वारसाच लाभलेला नाही. घराणेशाही संपूर्ण जगात सुरु आहे. जगात कुठलाच असा देश नाही जिथे घराणेशाही नाही. प्रत्येक क्षेत्रात घराणेशाहीच असतेच आणि तिथे त्यांचे योगदान पाहिले जाते, असे त्यांनी सांगितले.

“असा एक व्यवसाय सांगा ज्यामध्ये लोकं आपल्या कुटुंबाला पुढे आणत नाही. तीच गोष्ट राजकारणातही होत आहे, राजकारणात एखाद्या पक्षात जर घराणेशाही सुरु असेल तर त्या व्यक्तीचे योगदान पक्ष आणि मतदार लक्षात घेतील.  इतर व्यवसायातही हाच प्रकार होत आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले . मोदींनी आधी आपल्या पक्षामधील नेत्यांकडे पहावे, त्यांच्या हिंदी भाषिक नेत्यांमध्येही अशाचप्रकारे घराणेशाही सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसवर टीका करण्याआधी मोदींनी विचार करावा”, असेही अन्वर यांनी म्हटले आहे.