पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप नेत्यांनी सादर केलेली पदवी व गुणपत्रिका वैध असल्याचा निर्वाळा मंगळवारी दिल्ली विद्यापीठाने दिल्यानंतर बुधवारी ‘आम आदमी पक्षा’ने नवी प्रश्नावली मांडली असून त्यामुळे दिल्ली विद्यापीठ आणि भाजपही बेजार होण्याची चिन्हे आहेत.
मोदी यांनी ज्या काळात पदवी मिळवली त्याच काळातील अन्य विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकाच आपने सादर केल्या आहेत. त्या गुणपत्रिकांवरील गुण हे हाती लिहिले आहेत, तर मोदींचे गुण हे टंकलिखित आहेत. अन्य विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर ‘उत्तीर्ण’ हा शेरा हाती लिहिला आहे, मोदींच्या गुणपत्रिकेवर मात्र तो टंकलिखित आहे, याकडे आपचे नेते आशुतोष यांनी बुधवारी लक्ष वेधले.
अन्य विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर गुणपत्रिका कुणी तपासली आणि कुणी तयार केली हे स्वतंत्रपणे नमूद असून त्यावर संबंधितांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. मोदींच्या गुणपत्रिकेवर मात्र केवळ ती कुणी तपासली याचा उल्लेख आणि स्वाक्षरी आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे मोदी यांच्या १९७५, १९७६, १९७७ आणि १९७८ या वर्षांच्या सर्व गुणपत्रिकांवर २३६६ हा आकडा लिहिला असून तो एकाच हस्ताक्षरातला आहे. अन्य विद्यार्थ्यांच्या याच वर्षांच्या गुणपत्रिकांवर ‘दिल्ली विद्यापीठ’ हे नाव जुन्या फॉन्टमध्ये आहे.
मोदींच्या गुणपत्रिकेवर मात्र जो फॉन्ट वापरला आहे तो १९७५ मध्ये अस्तित्वातच नव्हता इतकेच नाही तर त्याकाळी संगणक नसूनही ही गुणपत्रिका संगणकावरून काढल्याचे दिसून येते, याकडेही आशुतोष यांनी लक्ष वेधले.
आणीबाणीच्या काळात मोदी हे दिल्लीतील अभाविपच्या कार्यालयात होते, असा दावा भाजप नेत्यांनी जाहीरपणे केला आहे. पण या कार्यालयाला पोलिसांनी सील ठोकले होते, मग मोदी तेथे कसे राहात होते? तसेच आपण शीखाच्या वेशात वावरत होतो, असे मोदी स्वत:च सांगतात. मग तरीही त्यांनी परीक्षा कशी दिली? असे प्रश्नही आपने उपस्थित केले आहेत.