स्वयंपाकघरात..

* सुटे धान्य, गूळ, दूध, अंडी, मीठ, पापड, ब्रेड, सुटे पीठ, डाळ असे बरेच पदार्थ करमुक्त झाले असल्यामुळे ते स्वाभाविकच स्वस्त होतील. चीज, बटर मात्र काही प्रमाणात महागेल. जामची किंमत तर ५.६६ वरून थेट १८ टक्क्य़ांवर जाणार आहे.

* साखर आणि चहा या वस्तू ५ टक्के करटप्प्यात येतात. तेव्हा चहाची गोडी फार काही बिघडणार नाही. परंतु त्याबरोबर बिस्किटे खाऊ गेल्यास मात्र ते किंचित महाग जाईल.  सध्या १०० रुपये प्रति किलो भाव असलेल्या बिस्किटांवर ११.८९ टक्के, आणि १०० रु. प्रति किलो वरील बिस्किटांवर १६.०९ टक्के कर आकारला जातो. तो सरसकट १८ टक्क्य़ांवर जाणार.

* कॉर्न फ्लेक्सवरील करही ९.८६ टक्क्य़ांवरून १८ टक्क्य़ांवर जाणार आहे.

* लहान मुलांसाठीचे अन्नपदार्थ – बेबी फूड हे मात्र यापुढे किमान दुप्पट किमतीला विकत घ्यावे लागेल असे दिसते. त्यावरील कर ७.६ टक्क्य़ांवरून १८ टक्क्य़ांवर नेण्यात आला आहे.

स्वयंपाकघरातील वस्तूंवरही या कराची संक्रांत येईल असे दिसते. चमचे, काटे, सुऱ्या असे ‘टेबलवेअर’, तसेच सेरॅमिक्सची, प्लास्टिकची भांडी हे ‘किचनवेअर’ महागण्याची शक्यता आहे.

प्रसाधनगृहात काय?

टूथपेस्ट, केशतेल, साबण, शाम्पू या वस्तू ७ ते १८ टक्के या करटप्प्यांत आहेत. यात महिलावर्गासाठी थोडी वाईट बातमी म्हणजे सौंदर्यप्रसाधने आणि अत्तर, सुगंधी द्रव्ये या वस्तू नव्या कररचनेत महागण्याची शक्यता आहे.

दिवाणखान्यात..

* प्रत्येक घराच्या दिवाणखान्यातील ‘अत्यावश्यक’ गोष्ट म्हणजे दूरचित्रवाणी संच. वस्तू-सेवा करापूर्वी तो घेतलेला असेल, तर ठीकच. कारण यापुढे दूरचित्रवाणी संचाच्या किमती वाढणार आहेत. टीव्हीवर यापुढे २५ ते २७ टक्क्य़ांवरून २८ टक्के कर असेल, तर डिजिटल कॅमेरे २५ ते २७ टक्क्य़ांवरून २८ टक्क्य़ांवर जातील. ही करमणूक जरा महाग झाली, तरी आपल्या देहाचा एक भाग झालेला मोबाइल फोन मात्र १३ ते २४ टक्क्य़ांवरून १२ टक्क्य़ांवर येणार आहे.

* तयार कपडय़ांची खरेदी हा अजूनही मध्यमवर्गीय घरांतील उत्सवी सोहळा. या कपडय़ांवर आजवर किमतीनुसार ५ ते १८.५ टक्के एवढा कर आकारला जात असे. तो आता खाली येणार आहे. म्हणजे हजार रुपये किमतीच्या कपडय़ांवर ५ टक्के, तर त्यावरील कपडय़ांवर १२ टक्के वस्तू-सेवाकर असेल.

पादत्राणे मात्र काहीशी ‘चावतील’. ५०० रुपयांहून अधिक किमतीच्या पादत्राणांवर यापुढे १८ टक्के कर मोजावा लागणार आहे. 

हातातील घडय़ाळांवरील कर २०.६४ वरून २८ टक्क्य़ांवर. याचा अर्थ या घडय़ाळांचीही वाईट वेळ सुरू होणार.

आणि दारात..

मद्यावर वस्तू-सेवा कर नाही. पण त्यात कोणी आनंद मानण्याचे कारण नाही. त्यावर राज्यांचेही अन्य सर्व कर असणारच. पेट्रोल आणि डिझेलचेही तसेच. त्यावर एकच एक कर असणार नाही. आणि त्याचवेळी छोटय़ा चारचाकीची किंमत महागणार आहे.

छोटय़ा कारवरील सध्याचा २५ ते २७ टक्के असलेला कर २८ टक्के असेल. आणि त्यात १ ते ३ टक्के सेसची भर पडेल. मोठय़ा कार मात्र तुलनेने स्वस्त असतील.

१५०० सीसीहून अधिक असलेल्या मोठय़ा कारवरील कर ४१.५ ते ४४.५ टक्क्य़ांवरून २८ टक्क्य़ांवर येईल आणि त्यावर अधिक १५ टक्के सेस लावला जाईल. कारऐवजी मोटारसायकली घ्याव्यात, तर त्यांचीही किंमत वाढली असेल. त्यांवरील कर सरसकट २८ टक्के असेल.

बँकांचे व्यवहार आणि आर्थिक सेवाही या नव्या करप्रणालीमुळे महागणार आहेत. त्यांच्यावरील कर १५ टक्क्य़ांहून १८ टक्क्य़ांवर जाणार आहे. एव्हाना त्याची माहिती देणारे संदेश अनेकांच्या मोबाइलमध्ये येऊन पडलेही असतील..

gst04

*(वस्तू-सेवांची विद्यमान प्रातिनिधिक किमती गृहीत धरून, नव्या करप्रणालीत त्या त्या वस्तू व सेवांसाठी निर्धारित करटप्प्यांनुरूप किमतीतील वाढ-घट दर्शविणारे हे अंदाजपत्रक बनविले गेले आहे. नव्या करप्रणालीच्या परिणामी काहींच्या किमती वाढल्या तर काही कमी झाल्याने कुटुंबाच्या एकूण अंदाजपत्रकावरील किंचित करभार वाढल्याचे दिसेल.)