मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बोगस मतदान करता यावे यासाठी मध्य प्रदेशात बोगस मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्याच्या शिवराज सिंह चौहान सरकारवर केला आहे. ‘गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली तर राज्यात ४० टक्के मतदारांची संख्या कशी काय वाढली?’ असा सवालही त्यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.


शिंदे म्हणाले, भाजपाकडून जाणिवपूर्वक हा प्रकार करण्यात आला आहे. त्यांच्या विशेष टीमने विधानसभेच्या १०० मतदार याद्यांचे निरिक्षण केले आहे. यामध्ये एकाच उमेदवाराचे नाव २६ जागी आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणी तत्काळ कारवाईची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले, त्यांनी निवडणूक आयोगाला या प्रकारासंदर्भात पुरेसे पुरावे दिले आहेत. त्याचबरोबर राज्यात सुमारे ६० लाख बोगस मतदारांच्या नावांवर आक्षेप घेत ही मतदार यादी हटवण्याची मागणी केली आहे. हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नव्हे तर प्रशासनाचा दुरुपयोग असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


मध्य प्रदेशात बनावट मतदान ओळख पत्रे आणि मतदार यादीचे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे. काँग्रेसने या प्रकरणी रविवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुधारित मतदार यादी तयार करण्याची खात्री दिली आहे. काँग्रेसने याप्रकरणी आरोप लावला की, राज्यात ६० लाखांपेक्षा अधिक बोगस मतदार आहेत. काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांची पुन्हा तपासणी करण्याची, सर्व रिटर्निंग अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मागणे, बोगस मतदारांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तसेच प्रतिमा डागाळलेल्या अधिकाऱ्यांवर १० वर्षांसाठी निवडणूक कार्यातून बाहेर ठेवण्याची मागणी केली आहे. आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राज्याच्या निवडणूक आयोगाने मतदार यादीचे प्रकाशन केले आहे. यामध्ये अनेक घोटाळे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रवक्ते मानक आग्रवाल यांनी म्हटले होते की, एकाच फोटोवर ४० लोक मतदान करीत आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश आहे. या खेळामध्ये सर्वच जिल्हाधिकाऱ्यांचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.