माजी मंत्री रेहमान मलिक यांचा आरोप
पाकिस्तानी-अमेरिकी नागरिक व दहशतवादी डेव्हिड हेडली याने माफीचा साक्षीदार म्हणून न्यायालयापुढे दिलेल्या जबाबातील तपशील खोटा असून भारत त्याचा वापर करीत पाकिस्तानला मुंबईतील २००८ च्या हल्ला प्रकरणात बदनाम करीत आहे, असा आरोप त्या देशाचे माजी अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी केला.
हेडली याने लागोपाठ दुसऱ्या दिवशी अमेरिकेतील अज्ञात ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्राच्या मदतीने दिलेल्या जबाबात असे म्हटले होते की, लष्कर ए तोयबा या संघटनेचा मुंबई हल्ल्याच्या अगोदर ताज महाल हॉटेलमध्ये भारतीय संरक्षण वैज्ञानिकांवर हल्ला करण्याचा इरादा होता.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनला तेव्हाचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी सांगितले की, हेडलीच्या जबाबात नसलेली खोटी माहिती देऊन भारत पाकिस्तानला बदनाम करीत आहे. हेडलीचा जबाब पूर्ण खोटा आहे.
ते म्हणाले की, हेडली हा भारताचाच गुप्तचर हस्तक होता व त्याने मुंबईतील हल्ले घडवून आणले व नंतर त्याच्याकडून हवे ते वदवून घेतले जात आहे. त्याची तिकिटे कोण काढत होते त्याला कुणी पैसा दिला याची माहिती आमच्याकडे आहे, त्याने पाकिस्तानातील अतिरेक्यांना पैसे देऊन हल्ला करायला लावले असा दावा मलिक यांनी केला. हेडली याला २०१३ मध्ये शिकागो न्यायालयाने ३५ वर्षे कारावासाची शिक्षा मुंबईच्या नोव्हेंबर २००८ प्रकरणात दिली आहे.