पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुलवामा हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणुकांच्या तोंडावरच हा हल्ला कसा काय झाला? असा सवाल त्यांनी केला आहे.


ममता म्हणाल्या, गुप्तचर यंत्रणांकडून ८ फेब्रुवारीला इशारा देण्यात आला होता की, निवडणुकांपूर्वी अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो. मग यावर तत्काळ कार्यवाही का करण्यात आली नाही. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतरही सीआरपीएफच्या ७८ वाहनांचा मोठा जत्थ्याला एकत्र का पाठवण्यात आलं, त्यांना एअरलिफ्ट का करण्यात आलं नाही. यामध्ये असा किती पैसा खर्च होणार होता. ज्या लोकांनी हा हल्ला घडवून आणला त्यांच्यावर सरकारने कारवाई करायला हवी असेही त्या यावेळी म्हणाल्या.

जर यावरुन भाजपा-आरएसएसच्या लोकांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तर देश त्यांना कधीही माफ करणार नाही. मला देखील गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली आहे की, माझे फोन टॅप केले जात आहेत, याची तुम्हाला सर्वांना माहिती आहेच, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर पुन्हा सडकून टीका केली.

आजवर पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू या दहशतवादी हल्ल्यावरुन मोदी सरकारला घेरत होते. मात्र, आता ममता बॅनर्जी यांनी एक पाऊल पुढे टाकत या हल्ल्याच्या काळ आणि वेळेवरच मोठा सवाल उपस्थित केला आहे.