यूपीएच्या काळात म्हणजेच मनमोहन सिंग हे जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला NPA (वाढते थकित कर्ज) च्या कॅन्सरची लागण झाली अशी टीका भाजपाने केली आहे. या संदर्भात भाजपाने एक पाच मिनिटांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. यूपीएने NPA च्या रुपाने देशाला शाप दिला आहे असे लिहिण्यात आले आहे.

आपले म्हणणे योग्य आहे हे दाखवण्यासाठी भाजपाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी संसदिय समितीला एनपीएबाबत पाठवलेल्या उत्तराचा हवाला घेतला आहे. आपल्या लेखी उत्तरात रघुराम राजन यांनी एनपीए अर्थात वाढत्या थकीत कर्जाला यूपीए सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. घोटाळे आणि चौकशी यांच्या फेऱ्यामुळे यूपीए सरकारची निर्णय घेण्याची गती मंदावली होती असे म्हटले आहे. या सगळ्यावर यूपीए सरकारने केलेले उपाय म्हणजे भळभळणाऱ्या जखमेला बँड लावून मलमपट्टी केल्यासारखे होते असेही भाजपाने व्हिडिओत म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ

अर्थव्यवस्थेला झालेल्या या कॅन्सरसाठी मोदी सरकारला खोलवर जाऊन शस्त्रक्रिया करावी लागली आहे असाही उल्लेख भाजपाच्या व्हिडिओत करण्यात आला आहे. तसेच मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून काय उपाय केले याचेही वर्णन या व्हिडिओत करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसने विजय मल्ल्या पळून गेल्यासंदर्भातली टीका करत भाजपाला लक्ष्य केले होते. विजय मल्ल्या पळून जाणार होता हे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींना ठाऊक होते तरीही त्यांनी मल्ल्याला देश सोडून जाऊ दिले अशी टीका काँग्रेसने केली होती. त्यासाठी काँग्रेसने एक व्यंगचित्र ट्विट केले होते. त्याच टीकेला आता भाजपाने आपल्या पद्धतीने ट्विट करून उत्तर दिले आहे.