साहेब, इथे रोजगाराच्या संधी नाहीत, गोदिंयात बोटावर मोजण्याऐवढ्या मोठ्या कंपन्या, शेतीसाठीचा खर्च वाढला आणि उत्पन्न कमी, अशा स्थितीत फक्त शेतीवर अवलंबून राहता येत नाही, मग तरुणांना रोजगारासाठी बाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही. गोंदियातील धापेवाडा गावातील फारुख शेख गावातील कैफियत पोटतिडीकेने मांडत होते.

भंडारा- गोंदिया या मतदारसंघात भाजपाचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांच्यात लढत असून २०१४ मध्ये या मतदारसंघात भाजपाकडून नाना पटोले लोकसभेवर निवडून गेले. आता नाना पटोले काँग्रेसच्या गोटात असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे.

धापेवाडा भागातील एका टेलरच्या दुकानात निवडणुकीवर चर्चा रंगल्या होत्या. या दुकानाच्या बाजूलाच फारुख शेख यांचा गादीचा व्यवसाय आहे. गेल्या १५ वर्षांपासून ते इथे व्यवसाय करतात. फारुख शेख म्हणतात, या मतदारसंघात हिंदू- मुस्लीम यांच्यात कधी तेढ निर्माण झाली नाही. दोन्ही समाज सुखाने एकत्र नांदतात. ही जमेची बाब आहे. पण शेतमालाला अपेक्षित भाव न मिळणे आणि बेरोजगारी ही प्रमुख समस्या असल्याचे ते सांगतात. माझी स्वत:ची शेती आहे. पण अडीच एकरच्या शेतीत वर्षाला २० ते ३० हजार इतकेच उत्पन्न मिळते. सुदैवाने मी गादीचा व्यवसाय करत असल्याने आमच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत नाही. पण जे गरीब शेतकरी आहेत, त्यांची अवस्था बिकट असते, असे फारुख शेख सांगतात.

तर महेंद्र बघेले हे गावातील शाळेत शिक्षक. बेरोजगारीविषयी ते म्हणतात, गावात बेरोजगारी प्रमुख समस्या आहे. रोजगार नसल्याने तरुण नागपूर, मुंबई, पुणे आणि शेजारच्या छत्तीसगड राज्यात जातात. सध्या या भागातील सुमारे १० ते १५ तरुण हे रोजगारासाठी अरब देशातही गेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. भेलसारखे प्रकल्प मार्गी लावण्याची गरज आहे, असे ते आवर्जून सांगतात.

नवेगाव या गावातील धर्मराज राणे हे देखील शेती करतात. त्यांच्या पत्नीच्या नावावर एक एकरची जागा असून मोदी सरकारच्या पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत पत्नीला दोन हजार रुपये मिळाल्याचे ते सांगतात. माझ्या पत्नीला पैसे मिळाले, पण गावातील असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना पात्र असूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही. पात्र असणाऱ्या ५० पैकी जर फक्त चार शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार असेल तर हे सरकारचे यश म्हणायचे का?, माझ्या गावातील अन्य पात्र शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार, असा सवाल ते विचारतात. या गावात १५०० ते १६०० मतदार आहेत. त्यापैकी काही तरुण हे रोजगारासाठी बाहेरगावी आहेत, ते मतदानाला येतील याची खात्री नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा दोघांमध्ये यंदा काँटे की टक्कर असेल, असे राणे नमूद करतात. विशेष म्हणजे या मतदारसंघात पोवार समाजातील राजेंद्र पटले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. यावर राणे म्हणतात, आमच्या समाजातील नेता असला तरी आपण नेत्याची जात पेक्षा तो काय काम करु शकतो, याचा विचार केला पाहिजे.

तर नीळगोंदी येथे राहणारे भावेश बिजेवाल हे बेरोजगारीमुळे गावात असंतोष खदखदत असल्याचे सांगतात. गोंदियात एकही नवीन कंपनी नाही, लोकांकडे रोजगार नाही, इथे डोंगरावर खडी फोडायचे काम असायचे. ते देखील आता बंद आहे. मनरेगा अंतर्गत काम मिळत नाही, मग तरुणांनी काय करावे, असा सवाल ते विचारतात.

भंडारा- गोंदिया मतदारसंघात सुमारे १७ लाख मतदार आहेत. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. मोदींनी गोंदियात केलेल्या भाषणात पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राइक हा प्रमुख मुद्दा होता. याविषयी स्थानिकांमध्ये मतमतांतर दिसून येते. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणारा आणि जगभरात भारताची बाजू ठोसपणे मांडणारा नेता हवा, असे मत काही मतदारांनी व्यक्त केले. तर देशाची सुरक्षा तर प्रत्येक सरकारला करायचीच आहे, पण स्थानिकांचे प्रश्न सोडवणारा नेता हवा, अशी भूमिका काही मतदारांनी व्यक्त केली.

या मतदारसंघावर कुणबी समाजाचे वर्चस्व असून दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार हे कुणबी समाजातून येतात. बसपानेही या मतदारसंघात कुणबी समाजातील उमेदवार दिला आहे. बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीचे उमेदवार हे आघाडीसाठी तापदायक ठरु शकतात, असा अंदाज आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे भंडारा- गोंदियाचा गड कायम राखण्याचे आव्हान प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर आहे. तर कोणत्याही परिस्थितीत २०१४ ची पुनरावृत्ती करायचीच, असा निर्धार करत भाजपाचे नेते गल्लीबोळ्यापर्यंत प्रचार करत आहेत. पण भाजपातील बंडखोरी पक्षासाठी तापदायक ठरु शकते. राजेंद्र पटले हे भाजपाचे स्थानिक नेते असले तरी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे.