पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एक आठवड्यांच्या या दौऱ्यात नरेंद्र मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेत जंगी तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेतील ह्युस्टन शहरातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत. यासाठी तेथील रस्त्यांवर मोदींच्या स्वागतासाठी मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. असे असतानचा आता फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग आणि मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष सत्या नाडेला यांनी मोदींच्या दौऱ्याबद्दल मत व्यक्त केले आहे.

मोदींच्या या दौऱ्याबद्दल बोलताना झकरबर्गने डिजीटल इंडिया मोहिमेचे आणि ऑनलाइन माध्यमांवर अॅक्टीव्ह असणाऱ्या पंतप्रधान मोदींचेही कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान मोदी डिजिटल इंडियाविषयी करत असलेल्या प्रयत्नांचे मला मनापासून कौतुक आहे. भारताने प्रगतीपथावर रहाण्यासाठी देशाने ऑनलाइन क्षेत्रात आघाडीवर असण्याची गरज आहे,’ असे मत झकरबर्ग यांनी नोंदवले आहे.

मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष सत्या नाडेला यांनीही भारताचे कौतुक केले आहे. ‘भारतामध्ये जागतिक दर्जाचे उद्योजक आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची धोरणेही योग्य आहेत,’ अशा शब्दांमध्ये नाडेला यांनी मोदींची स्तुती केली आहे.

‘क्वालकॉम’चे या लोकप्रिय कंपनीचे माजी कार्यकारी अध्यक्ष पॉल जॉकोब्स यांनीही पंतप्रधान मोदींच्या धोरणाप्रमाणे आम्ही भारताला डिजिटली सक्षम बनवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान मोदींचा हा परदेश दौरा २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रासमोर भाषण देणार आहेत. तसंच याशिवाय न्यूयॉर्क येथे अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असणार आहे.