ह्य़ुस्टनमधील ‘हाउडी मोदी’ या मेळाव्यामधील मोदींचे भाषण चांगलेच गाजले. अगदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करण्यापासून ते पाकिस्तानवर नाव न घेता टिका करण्यापर्यंत मोदींच्या अनेक मुद्द्यांना उपस्थित अनिवासी भारतीयांनी भरभरुन दाद दिली. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात वापरलेल्या एका मुद्द्यावरुन मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ट्रम्प यांनी आपल्या भाषणामध्ये ‘इस्लामिक दहशतवाद’ असा उल्लेख केला त्यानंतर ते थोडे अडखळले. मात्र मोदी यांनी हाच मुद्दा पकडून आपल्या भाषणामधून पाकिस्तानवर टीकेचा भडीमार केला. विशेष म्हणजे मोदींनी पाकिस्तान तसेच इम्रान खान यांच्या नावाचा उल्लेखही न करता आपला इशारा कोणाकडे आहे हे भाषणातून दाखवून दिले.

ट्रम्प यांनी केला उल्लेख

ट्रम्प आपल्या भाषणादरम्यान मोदी यांचा उल्लेख महान नेते असा केला. ६१ कोटी मतदार ही खूप मोठी संख्या आहे. या जनतेने मोदी यांच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. अमेरिकेतील भारतीयांनी या देशाला समृद्ध केले. येथे आलेले ५० हजार नागरिक या समृद्धीचे आणि भारत-अमेरिका मैत्रीचे प्रतीक आहे. भारताची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. त्याचबरोबर, इस्लामी मूलतत्त्ववादाविरोधात आमचा लढा भारताच्या बरोबरीने सुरू राहील, असे ट्रम्प यांनी सांगितले. मोदी आणि ट्रम्प यांनी परस्परस्तुती करून आणि भारत-अमेरिका मैत्रीचा विविधांगी आढावा घेतानाच, इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचे आश्वासनही स्वतंत्र भाषणांमध्ये दिले.

मोदींनी लावून धरला ट्रम्प यांचा मुद्दा

ट्रम्प यांनी आपल्या एका वाक्यामध्ये इस्लामी मूलतत्त्ववादाविरोधाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर मोदींनी त्याच मुद्द्यावरुन आपल्या भाषणातून पाकिस्तानवर तोफ डागली. ‘दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अध्यक्ष ट्रम्प दहशतवादाविरोधात उभे आहेत, असे मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले. ज्यांना स्वत:चा देश सांभाळता येत नाही, अशा मंडळींनी भारतद्वेषाला केंद्रस्थानी ठेवले. दहशतवादाचे समर्थन देणाऱ्यांना सारे जग ओळखून आहे. ९/११ किंवा २६/११ चे सूत्रधार कोठे सापडतात हे सर्वांना ठाऊक आहे, या मोदींच्या विधानाला उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली.

पाकिस्तानकडून आंदोलनाचा प्रयत्न

दरम्यान मोदींच्या या ह्य़ुस्टनमधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पाकिस्तान समर्थकांनी आंदोलन केले. मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पाकिस्तानचे काही मंत्रीही या आंदोलनात सहभागी झाले होते. मोदींच्या या कार्यक्रमाआधीच ऑनलाइन माध्यमातून फुटीरतावादी शीख आणि इतर अल्पसंख्यांकांना हाताशी धरुन पाकिस्तानने या कार्यक्रमाचा विरोध करण्याचे धोरण राबवले होते. मात्र मोदींच्या या मेळाव्याला मिळाला प्रतिसाद पाहता पाकिस्तानचे सर्व डाव पुन्हा त्यांच्यावरच उलटल्याचे दिसून आले.