पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ह्युस्टनमधील ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी रात्री दाखल झाले. त्यानंतर मोदी यांची ऊर्जा सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्युस्टनमधील ऊर्जा कंपन्यांच्या सीईओंशी गोलमेज बैठक (राउंड टेबल) पार पडली. या बैठकीनंतर मोदी यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली आहे. “ह्युस्टनमध्ये यायचं आणि तेल कंपन्यांशी बोलायचं नाही, हे अशक्य आहे,” असं मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी एका आठवडा अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारतीय वेळेनुसार मोदी शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ह्यूस्टनमध्ये दाखल झाले. ह्युस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’कडून आज ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात मोदी भारतीय नागरिकांना संबोधित करणार आहेत.

दरम्यान, तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ह्युस्टनमधील ऊर्जा कंपन्यांच्या सीईओंसोबत गोलमेज बैठक झाली. हॉटेल पोस्ट ओकमध्ये ही बैठक झाली. या बैठकीनंतर मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. “ह्युस्टनमध्ये यायचं आणि ऊर्जा कंपन्यांशी भेटायचं नाही. हे अशक्यच आहे. अग्रेसर असलेल्या ऊर्जा कंपन्यांच्या सीईओंशी खुपच छान चर्चा झाली. ऊर्जा क्षेत्रातील संधींचा उपयोग करण्याच्या पद्धतींबद्दल संवाद झाला. तसेच यावेळी टेलुुरियन आणि पेट्रोनेट एलएनजी यांच्यात सांमजस्य करार झाला,” असे मोदी म्हणाले.

या गोलमेज बैठकीपूर्वी बोलताना आयएएस मरकित कंपनीचे उपाध्यक्ष डॅनियल यार्गिन यांनी मोदींची उपस्थिती हे महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. “ऊर्जा क्षेत्राशी संदर्भाने भारत आणि अमेरिकेतील सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी इथे आले आणि ही मोठी घटना आहे. मोदी आले याचाच अर्थ दोन्ही देशात चांगले संबंध वृद्धिंगत करू शकतो.” डॅनियल यार्गिन यांनी म्हटले आहे.