हिमाचल प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष विपीन सिंह परमार यांनी आमदारांना अधिवेशनात हळू आवाजात बोलण्याची सूचना केली. जोरात बोलण्याने करोनाचा फैलाव होण्यास मदत होईल असं सांगत त्यांनी आमदारांना सर्व नियमांचं पालन करण्यास सांगितलं. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बोलताना ते म्हणाले की, “मार्गदर्शक सूचनांनुसार जोरात बोलण्याने करोनाचा फैलाव होण्यात मदत होते. त्यामुळे नेहमी बोलता त्याच पद्धतीने बोला”.

विधानसभा अध्यक्षांच्या या सूचनेवर आमदार जोरजोराने हसू लागले. काही आमदारांनी तर विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चेत सहभागी होताना जोरजोरात बोलण्यास सुरुवात केली. सोमवारी भाजपा आमदार रिटा देवी करोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. सोमवारी रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह येण्याआधी त्यांनी अधिवेशनात हजेरी लावली होती. यावेळी आपण इतर सदस्यांसोबत सोशल डिस्टन्सिंग ठेवलं होतं असं त्यांनी सांगितलं होतं. हिमाचल प्रदेशातील तीन आमदारांना सध्या करोनाचा संसर्ग झाला आहे.

विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना करोनाची कोणताही लक्षणं आढळल्यास घरात स्वत:ला क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला आहे. तसंच अधिवेशनात हजेरी लावण्याआधी थर्मल स्क्रिनिंग करण्यासंही सांगितलं आहे.