जगभरात सर्वत्र करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. आजही भारतात करोना चाचणीचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. करोना चाचणीचे हे महागडे दर लक्षात घेऊनच केंद्र सरकारने आज स्वस्तातील करोना टेस्ट किट लाँच केलं.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे या दोघांनी मिळून आज सगळयात स्वस्तातील करोना टेस्ट किट लाँच केलं. दिल्ली आयआयटीने या स्वस्तातील करोना टेस्ट किटची निर्मिती केली आहे.

न्यूटेक मेडिकल कंपनी हे किट बाजारात उपलब्ध करणार आहे. ‘कोरोश्योर’ असे या किटचे नाव आहे. . “कोरोश्योर’ मुळे देशात करोना चाचण्यांच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होईल. चाचण्यांची संख्या आणि किंमत यामध्ये फरक दिसेल. न्यूटेक मेडिकल कंपनी आयआयटी दिल्लीची टेक्नोलॉजी वापरणार आहे. परवडणाऱ्या दरात महिन्याला २० लाख चाचण्या करणे शक्य आहे” असे आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव म्हणाले. या किटला आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे.