केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सकाळी त्या खात्याच्या मावळत्या मंत्री स्मृती इराणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आमच्या दोघांमध्ये शिक्षण विषयक विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे भेटीनंतर जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले. जावडेकर गुरुवारी या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्मृती इराणींची भेट घेऊन त्यांच्याकडून विविध निर्णयांची आणि पुढील कामाची माहिती घेतली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला. यामध्ये सर्वात लक्षवेधक घटना म्हणजे स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेऊन त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली. दुसरीकडे प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती देऊन त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. मोदी यांच्या या निर्णयामुळे अनेका धक्का बसला.
स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आल्यापासून सातत्याने कोणते ना कोणते वाद उपस्थित होत होते. रोहित वेमुला प्रकरण, जेएनयूतील विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय विद्यापीठातील कुलगुरूंच्या नेमणुका या मुद्द्यांवरून विरोधकांकडून सातत्याने स्मृती इराणी यांच्यावर टीका करण्यात आली. त्याचबरोबर स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दाही पहिल्यापासून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे त्या कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिल्या होत्या. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन मोदी यांनी मंगळवारी त्यांची वस्त्रोद्योग मंत्री म्हणून नियुक्ती केली.
स्मृती इराणी यांच्याशी आपली विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, जावडेकर यांच्याकडे जबाबदारी असलेल्या पर्यावरण मंत्रालयाचा कारभार बुधवारी अनिल माधव दवे यांच्याकडे सोपविण्यात आला.