नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एचआरडी) तयार केलेले शांततेचे सूत्र मान्य करावे किंवा राजीनामा द्यावा, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना ‘एचआरडी’ने सांगितल्याची विश्वसनीय माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे. दुसरीकडे, उच्च शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यम यांची बदली करण्यात आली आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तयार केलेल्या सूत्रानुसार, जेएनयू प्रशासन केवळ खोलीचे वाढीव भाडे आकारणार असून, सेवा आणि उपयोगिता शुल्काचा भार विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पेलावा लागणार  आहे. या बदल्यात, विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेणे आणि विद्यापीठ प्रशासनाशी संवादाची तयारी दर्शवणे अपेक्षित आहे.

वाया गेलेल्या शैक्षणिक कालावधीचे नुकसान भरून काढण्यासाठी, चालू सत्राची मुदत दोन आठवडय़ांनी वाढवण्यास जेएनयूला सांगण्यात आले आहे. विद्यार्थी संघटनेला सूचित करावे आणि विद्यार्थ्यांविरुद्धची पोलीस तक्रार मागे घ्यावी, असा सल्ला विद्यापीठाला देण्यात आला आहे.