शिक्षणक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण मूल्यांकन सुधारणांचा भाग म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून राज्य आणि केंद्रीय शाळांसमोर ‘ओपन बूक टेस्ट’चा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक स्तरावरील परीक्षांसाठी या पद्धतीचा अवलंब करावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावानुसार, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवताना नोटस आणि पाठ्यपुस्तकांचा वापर करता येणार आहे. या परीक्षा पद्धतीत पाठांतरापेक्षा विद्यार्थी उपलब्ध माहितीचा उपयोग कशाप्रकारे करतात यावर भर असेल. पाठ्यपुस्तकातील माहिती केवळ कागदावर उतरवण्यापेक्षा पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊन परीक्षार्थी एखाद्या प्रश्नाचे किंवा परिस्थितीचे विश्लेषण कसे करतात, हा या परीक्षा पद्धतीचा केंद्रबिंदू असेल.
मागील वर्षी २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या ४२ शैक्षणिक महामंडळाच्या बैठकीत शालेय शिक्षण विभागाचे सचिव एस. सी. खुंटिया यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी या प्रस्तावातंर्गत प्रश्नपत्रिकेचा सामाईक आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यीस समितीची नेमणूक केली होती. बोर्डाच्या परीक्षांसाठी ‘ओपन बूक परीक्षा मूल्यांकन’ पद्धतीचा अवलंब करण्याचा मुद्दा या समितीचा प्राधान्यक्रम होता.