राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परिक्षा (NEET) परिक्षा आता वर्षातून एकदाच आणि ती ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. महिन्याभरापूर्वीच मंत्रालयाने २०१९ पासून NEET परिक्षा ऑनलाइन पद्धतीने वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला होता, आता हाच निर्णय सरकारने मागे घेतला आहे. मात्र, संयुक्त पात्रता परिक्षा (JEE) वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आता NEET परिक्षा पारंपारिक पद्धतीने पेपर आणि पेनद्वारे घेण्यात येणार आहे. NEET परिक्षा ऑनलाइन घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानुसार, हा बदल करण्यात आला आहे.

या निर्णयाबरोबरच NEET-2019 च्या परिक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून NEETची नोंदणी प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून ५ मे रोजी परिक्षा होणार आहे. मात्र, संयुक्त पात्रता परिक्षा (JEE) वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

६ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली होती की, राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परिक्षा (NET, NEET, JEE) या सीबीएसई अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत (NTA) घेण्यात येतील. त्याचवेळी जावडेकर यांनी या परिक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले होते. त्यानुसार, JEE (Mains) वर्षातून दोनदा जानेवारी आणि एप्रिलमध्ये घेण्यात येईल, NEET परिक्षा फेब्रुवारी आणि मेमध्ये घेण्यात येईल. तर राष्ट्रीय पात्रता परिक्षा (NET) ही डिसेंबरमध्ये घेण्यात येईल.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या या घोषणेवर आक्षेप घेतला होता. तसेच तीनच दिवसांत मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र पाठवून NEET परिक्षेबाबतची सार्वजनिक घोषणा आमचा सल्ला घेतल्याशिवाय करण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच या पत्रामध्ये परिक्षापद्धतीमधील ८ अडचणींचा उहापोह करण्यात आला होता. यामध्ये ऑनलाइन परिक्षा पद्धतीमुळे गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचे म्हटले होते.