म्यानमारमध्ये नवनिर्वाचित संसद सदस्यांनी आँग सान स्यू की यांचे निकटवर्ती असलेले उ तिन च्यॉ यांची देशाचे पहिले नागरी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. म्यानमारमध्ये यापूर्वी लष्करी राजवट होती व त्या देशात लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्यानंतर हा ऐतिहासिक क्षण होता. च्यॉ यांनी सांगितले की, या सर्वोच्चपदी माझी झालेली निवड हा स्यू की यांचाच विजय आहे. आता च्यॉ हे स्यू की यांच्या वतीने काम करतील कारण स्यू की यांना घटनात्मकदृष्टय़ा अध्यक्षस्थान भूषवता येणार नव्हते. मतदानानंतर च्यॉ यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर खासदारांनी आनंद व्यक्त केला. ६५२ पैकी क्यॉ यांना ३६० मते मिळाली. नायपीदॉ या राजधानीच्या शहरात हाताने मतमोजणी करण्यात आली. म्यानमार आतापर्यंत लष्करशाहीच्या जोखडाखाली होता, आता तेथे लोकशाही राजवट सुरू होत आहे. स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला नोव्हेंबरमधील निवडणुकीत विजय मिळाला होता, त्यामुळे दोन्ही सभागृहात त्यांना बहुमत मिळाले होते. आग्नेय आशियातील म्यानमारमध्ये अजूनही लष्करच शक्तिशाली असून त्यांनी स्यू की यांना अध्यक्ष होण्यापासून रोखणारी तरतूद बदलण्यास नकार दिला आहे. स्यू की यांनीच तिन च्यॉ यांना अध्यक्षपदी काम करण्यासाठी उमेदवारी दिली होती.  १ एप्रिल रोजी ते अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतील. थेसेन यांच्या पाच वर्षांच्या लष्कर समर्थित सत्तेचा आता शेवट झाला आहे.

अध्यक्षीय शर्यतीत आणखी दोन उमेदवार होते, त्यांची आता संयुक्त उपाध्यक्षपदी निवड होणार आहे. त्यात निवृत्त जनरल मिंट स्वे यांचा समावेश असून ते लष्कराचे उमेदवार आहेत. त्यांना २३० मते पडली तर हेन्री व्ॉन थियो यांना ७९ मते पडली. ते दोघे आता संयुक्त उपाध्यक्ष असतील. अजूनही म्यानमारमध्ये लोकशाहीची पहाटच झाली एवढेच म्हणता येईल, कारण वीज, गृह व सीमा सुरक्षा ही खाती लष्कराच्या हातात आहेत. लष्करप्रमुख मिन ऑंग लेइंग यांच्याशी झालेल्या वाटाघाटी फिसकटल्याने स्यू की यांच्या अध्यक्षीय निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला नाही.