भारत-पाकिस्तान दरम्यान असलेल्या परस्पर संबंधांचे, प्रतिस्पर्धत्वाचे, बंधुभावाचे आणि सहकार्याचे प्रतिक असलेला ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळा. हा सोहळा पाहणे रोमांचित करणारा आणि देशप्रेम जागवणारा अनुभव असतो. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वाघा-अटारी सीमेवर मोठ्या जल्लोषात हा विशेष सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणावर देशभरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ‘भारत माता की जय’च्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.


दरदिवशी संध्याकाळी सूर्य मावळण्यापूर्वी हा सोहळा आयोजित केला जातो. ‘ग्रँट ट्रंक रोड’वर या सोहळ्याचे आयोजन केले जाते. १९९९ पूर्वी काश्मीरमध्ये ‘अमन सेतू’ हा मार्ग सुरु करण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानला रस्त्याने जोडणारा हा एकमेव मार्ग होता. या सोहळ्याला दोन्ही देशांच्या जवानांकडून परेडचे आयोजन केले जाते. त्यांच्या परेडमध्ये राग, जल्लोष आणि प्रखर देशभावना प्रतित होत असते. याला ‘कलरफूल’ असेही संबोधतात. भारताचे सीमा सुरक्षा दलाचे जवान ही परेड सादर करतात तर पाकिस्तानकडून पाकिस्तान रेंजर्स याचे सादरीकरण करतात. १९५९ पासून या ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्याचे एकत्रीत आयोजन केले जाते.


वाघा-अटारी सीमेवरील ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद पाहता आता फिरोजपूरजवळील हुसैनीवाला सीमेवर तसेच फझील्का येथील महावीर-सादकी सीमेवरही अशा ‘बीटिंग रिट्रीट’चे आयोजन केले जात आहे.