करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा परिस्थिती हाताबाहेर जात आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे लोकांकडून सर्रासपणे नियमांचं उल्लंघन होत आहे. अशीच कर्नाटकमधील एक घटना समोर आली आहे. बिजापूर जिल्ह्यात चक्क बोकडांची फाइट पाहण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. यावेळी लोकांनी मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं अजिबात पालन केलं नव्हतं.

कर्नाटकमध्ये सध्या करोनाचे १५ हजार २४२ रुग्ण असून २४६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या करोनाचे ७०७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आणखी वाचा- वीज पडल्याने जखमी झालेल्यांना उपचारासाठी चक्क शेणात गाडलं अन्…

दरम्यान कर्नाटकमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकमधील बल्लारी येथील हा व्हिडी असून करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह खड्ड्यात फेकून दिले जात असल्याचं दिसत आहे. एकूण आठ मृतदेह एकाच खड्ड्यात फेकून देण्यात आले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यानंतर उपायुक्त एस एस नकूल यांनी मंगळवारी बिनशर्त माफा मागितली. ज्या पद्धतीने मृतदेहांना वागणूक देण्यात आली ते पाहून आपण प्रचंड नाराज आणि दुखी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.