पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या धक्कातंत्रामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, यावरुन दिल्लीत राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरु आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक दिग्गजांच्या खात्यात बदल होणार असल्याची चर्चा दिल्लीत आहे. मात्र कोणाला कोणते खाते मिळेल, याबद्दलची माहिती सध्याच्या घडीला तरी केवळ मोदी आणि शहांकडेच आहे. तरीही ल्युटन्स झोनमध्ये चर्चांना उधाण आले आहे. रेल्वे मंत्रालय नितीन गडकरींकडे जाण्याची चर्चा होती. आता नगर विकास मंत्रालयाची जबाबदारी त्यांना दिली जाईल, अशी चर्चा आहे.

सध्या देशाला पूर्ण वेळ संरक्षण मंत्री नाही. सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती आणि चीनकडून वारंवार केल्या जाणाऱ्या कुरघोड्या या पार्श्वभूमीवर देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्र्याची आवश्यकता आहे. ही जबाबदारी सुषमा स्वराज यांच्याकडे दिली जाऊ शकते. पण सुषमा स्वराज यांनी ते मंत्रिपद स्वीकारले पाहिजे. तसे झाल्यास सुरेश प्रभू यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार दिला जाईल. प्रभूंनी परराष्ट्र मंत्रालय स्वीकारल्यास त्यांच्या रेल्वे मंत्रालयाची धुरा नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात येईल, असे बोलले जाते.

व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे नगरविकास खाते कोणाकडे दिले जाणार याबद्दल उत्सुकता आहे. नायडूंनी उपराष्ट्रपतीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर नगरविकास खात्याला स्वतंत्र मंत्री देण्यात आलेला नाही. स्मार्ट सिटी हा मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प याच खात्याकडे येतो. या खात्याची जबाबदारीदेखील नितीन गडकरींना दिली जाईल, अशी चर्चा दिल्लीत आहे.

अर्थात या सर्व चर्चा आहेत आणि वर म्हटल्याप्रमाणे कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार आणि कोणाकडे कोणते खाते दिले जाणार, हे सध्या तरी केवळ मोदी आणि शहा या दोघांनाच माहिती आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींसह भाजपवर वारंवार टीका करणाऱ्या, राज्यात सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला शांत करण्याचा प्रयत्न मोदींकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. शिवसेनेला एक खाते दिले जाईल, अशी चर्चा दिल्लीत आहे. या जागेवर आनंदराव अडसूळ किंवा चंद्रकांत खैरे किंवा अनिल देसाई यापैकी एकाची वर्णी लागू शकते. मोदींनी याआधी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनिल देसाईंना स्थान देण्यात येणार होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीला न जाण्याच्या सूचना केल्याने अनिल देसाईंना मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले होते.

कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मोदींचा प्रयत्न असेल. यासाठी सुरेश अंगडी आणि शिवकुमार उदासी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता आहे. बिहारमध्ये भाजपशी हातमिळवणी करुन राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाल्याचा फायदा संयुक्त जनता दलाला मिळू शकतो. संयुक्त जनता दलाच्या आर. सी. पी. सिंह, कहकशा परवीन या दोघांना मंत्रिमंडळ विस्तारात जागा दिली जाऊ शकते. तर मध्य प्रदेशातून प्रल्हाद सिंह पटेल यांना संधी मिळू शकते.