मनुष्यबळ भांडवल निर्देशांकात भारताचा क्रमांक शंभरावा लागला आहे. मनुष्यबळ विकास व मनुष्यबळाचा वापर या निकषांच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो. फिनलंडने यात १२४ देशांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला असून, भारत ब्रिक्स देशांमध्येही खालच्या क्रमांकावर गेला आहे म्हणजेच रशिया, चीन, ब्राझील व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशात भारत मनुष्यबळ निर्देशांकात मागे आहे. श्रीलंका, भूतान, बांगलादेश हे देशही आपल्या पुढे आहेत पण पाकिस्तान मात्र ११३ व्या क्रमांकावर आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही यादी प्रसारित केली असून, त्यात फिनलंड पहिल्या क्रमांकावर आहे, तर त्यानंतर नॉर्वे, स्वित्र्झलड, कॅनडा, जपान, स्वीडन, डेन्मार्क, नेदरलँड्स, न्यूझीलंड व बेल्जियम यांचे क्रमांक लागले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ४६ निर्देशाकांच्या आधारावर ही यादी तयार केली असून त्यात हे देश मनुष्यबळ कसे विकसित करतात, ते कसे वापरतात, शिक्षणावर किती भर दिला जातो, कौशल्य व रोजगार संधी किती आहेत यांचा विचार केला जातो. एखादा देश त्याचे मनुष्यबळ फुकट घालवित आहे किंवा नाही हे यातून कळते.
भारताविषयी अहवालात म्हटले आहे की, या देशात शिक्षणात सुधारणा आहे, विविध वयोगटातील मुलांना शिक्षण मिळत आहे. तरुणांमधील साक्षरतेचे प्रमाण मात्र अजूनही ९० टक्केच आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या देशात ते जास्त असायला हले. कर्मचारी सहभागाच्या मुद्दय़ावरही भारत मागे पडला असून असंघटित कामगार क्षेत्र मोठे असणे यामुळेही भारताचे स्थान घसरले आहे.
भारताच्या वर असलेल्या देशात फ्रान्स (१४), अमेरिका (१७), इंग्लंड (१९), जर्मनी (२२) यांचा समावेश आहे. ब्रिक्स देशात रशिया (२६), चीन (६४), ब्राझील (७८), दक्षिण आफ्रिका (९२) यांचे क्रमांक आहेत.
भारताला वरचढ ठरलेल्या देशात कझाकस्थान, आर्मेनिया, किरगीझस्तान, चिली, फिलिपिन्स, सर्बिया, मंगोलिया, संयुक्त अरब अमिरात, मॅसेडोनिया, अजरबैजान, ताजिकीस्तान, मॉरिशस, बार्बाडोस, ब्राझील, ग्वाटेमाला, होंडुरास, कंबोडिया व टय़ुनिशिया या देशांचा समावेश आहे.
मनुष्यबळ विकासात पहिले दहा देश
*फिनलंड, नॉर्वे, स्वित्र्झलड, कॅनडा, जपान, स्वीडन, डेन्मार्क, नेदरलँड्स, न्यूझीलंड, बेल्जियम
*भारताचा क्रमांक -१००
*पाकिस्तानचा क्रमंक ११३