पुढील वर्षांपासून विधि आणि वैद्यकीय महाविद्यालयांसाठीही राष्ट्रीय क्रमवारी प्रणाली आणण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय विचार करीत आहे.
त्यामुळे विद्यापीठे, व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण महाविद्यालये राष्ट्रीय क्रमवारी प्रणालीचा भाग बनतील. स्मृती इराणी यांच्या मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, ४ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रमवारी प्रणालीबाबत मिळालेल्या सूचनांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत विचार करण्यात आला. या वेळी उच्च शिक्षण विभागाचे सचिव व्ही. एस. ओबेरॉय हे उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रमवारी प्रणालीत विधि आणि वैद्यकीय श्रेणीचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यानुसार विधि आणि वैद्यकीय महाविद्यालयांसाठी काही नियम लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय मान्यता मंडळाने राष्ट्रीय क्रमवारी प्रणाली घ्यावी असे सुचविण्यात आले आहे. तसेच विधि आणि वैद्यकीय महाविद्यालयांसाठी या दोन शाखांतील प्रवाहानुसार मानके ठरविण्यात यावीत, असेही सांगण्यात आले आहे.