विद्यार्थ्यांचे जाबजबाब; पोलिसांवर कारवाईसाठी कुलगुरूंचीआयुक्तांशी चर्चा

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने मंगळवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात जाऊन पोलीस कारवाईत गेल्या महिन्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे जाबजबाब नोंदवले.

या  प्रकरणाची चौकशी १७ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. मंगळवारी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पथक आले असता ३५-४० विद्यार्थ्यांनी त्यांना पोलिसांच्या  कारवाईबाबत माहिती दिली. या पथकाचे नेतृत्व वरिष्ठ पोलिस अधीक्षक मंझील सैनी करीत आहेत.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान दिल्लीत हिंसाचार झाला होता. त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी कारवाई केली होती. याबद्दल मानवी हक्क आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, वैद्यकीय उपचार नाकारणे असे प्रकार झाले होते. त्यानंतर मानवी हक्क आयोगाने याबाबत तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, गेल्या १५ डिसेंबरला विद्यापीठ आवारात घुसून केलेल्या कारवाईबाबत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी मंगळवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांची भेट घेतली. त्यांनी त्या दिवशीच्या हिंसाचाराबत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. अख्तर यांनी इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी क्रूर कारवाईबाबत पोलिसांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी कुलगुरू नजमा अख्तर यांना सोमवारी घेराव घातला होता. त्या वेळी त्यांनी प्राथमिक  माहिती अहवाल दाखल करण्यासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचे आश्वासन दिले होते. १५ डिसेंबरला नागरिकत्व कायद्याच्या विरोधात  हिंसाचार झाला होता.