उत्तर प्रदेशातील झाशी भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. धावत्या बसमध्ये एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर, बसचालकाने करोनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करत इसमाचा मृतदेह आणि पत्नीला रस्त्यावर उतरवलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रस्त्यावर उतरवल्यानंतर ही महिला मदतीसाठी याचना करत होती, परंतू आजुबाजूची लोकं फक्त तिच्याकडे दुर्लक्ष केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचं नाव हरदयाळ असून तो आपल्या पत्नीसोबत दिल्ली ते उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात बसने प्रवास करत होता. बस झाशी भागात आली असता हरदयाळ अचानक चालत्या बसमध्ये कोसळले. यावेळी बसचालकाने हरदयाळ यांच्या पत्नीची मदत करण्याऐवजी, त्यांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची शंका व्यक्त करत मृतदेहासह पत्नीला रस्त्यावर उतरत तिकडून निघून जाणं पसंत केलं.

आणखी वाचा- आठ कोटी रुपये… रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून करोनाबाधित रुग्णाला बसला धक्का

हरदयाळ यांची पत्नी मालू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये हरदयाळ यांना अचानक श्वसनाचा त्रास व्हायला लागला. हरदयाळ आपल्या पत्नीसोबत दिल्लीमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेले होते. परंतू लॉकडाउन काळात ते तिकडेच अडकले. सरकारने प्रवासाला परवानगी दिल्यानंतर हरदयाळ यांनी उत्तर प्रदेशात आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. दिल्लीवरुन बस पकडल्यानंतर हरदयाळ आणि त्यांच्या पत्नीने आग्रा परिसरात बस थांबली असताना नाश्ताही केला. बसचालक रस्त्यावर सोडून गेल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील कोणताही व्यक्ती आपल्या मदतीला आला नाही. अखेरीस स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येत, आपल्या प्रवासाची सोय करुन दिली अशी माहिती हरदयाळ यांच्या पत्नी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.