भारतात विविधतेत एकता पाहायला मिळते, या वाक्यावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असाच अट्टहास धरणाऱ्यांची संख्या गेल्या काही काळापासून वाढली होती. पण, यातच पुन्हा एकदा भारतीयांनीच खऱ्या अर्थाने आपल्या देशात जात, धर्म, पंथ, वर्ण या साऱ्या सीमांचं उल्लंघन करत देशातील एकतेचं सुरेख उदाहरण दिलं आहे. जिथे धर्माचं राजकारण करत देशाचं विभाजन करण्याची रणनिती आखली जात आहे, तिथेच देशाचे नागरिक मात्र विविध मार्गांनी त्यांच्यात असणारी एकतेची भावना सर्वांसमोर मांडत एक वेगळाच आदर्श घालत आहेत. सोशल मीडिया आणि काही वेबसाईट्सवरही सध्या याविषयीचीच चर्चा सुरु आहे.

उत्तराखंडच्या एका व्यक्तीच्या अनुभवातून हेच प्रतीत होत आहे. २० वर्षीय अजय बिलावलम या युवकाला कुष्टरोगाचं निदान झालं. त्याच्या रक्तातील पेशींचं प्रमाण झपाट्याने घटण्यास सुरुवात झाली. हे प्रमाण इतक्या पातळीपर्यंत घटलं की त्याच्या जीवाला धोकाच निर्माण झाला. या साऱ्यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीने त्याची मदत केली. अजयला A+ या रक्तगटातील रक्ताची गरज होती. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून त्याच्या वडिलांनी सोशल मीडियाचा आधार घेत मित्र आणि ओळखीच्यांकडून रक्ताची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी इतरांना रक्तदानाचं आवाहन केलं.

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आणि आरिफ खान याच्यापर्यंत पोहोचली. नॅशनल असोसिएशन ऑफ पॅरेंट्स अँड स्टुडंट्स राइट्सच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आरिफने लगेचच रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली.

वाचा : IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट

आरिफ रक्तदान करण्यासाठी रुग्णालयात गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याला काहीतरी खाण्याचा सल्ला दिला. पण, पवित्र रमजान महिना सुरु असल्यामुळे आरिफने रोजा ठेवला होता. ज्यामुळे आपण काही न खाता रक्तदान केले तर चालेल का, अशी विचारणा त्याने केली. डॉक्टरांनी असं करण्यास नकार दिला. पण, आपल्या उपवासापुढे एखाद्याचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, कारण ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ आहे, याच विचाराने आरिफने त्याचा रोजा सोडला आणि रक्तदान केलं.
आरिफच्या रक्तदानामुळे अजयचं आयुष्य किती वाढेल हे कोणालाच ठाऊक नाही. पण, त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या आरिफने सर्वांसमोर एक आदर्शच ठेवला आहे, असं म्हणायला हरकत नाही. एकिकडे धर्माच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना दुसरीकडे याच सीमा ओलांडत काही सर्वसामान्य चेहरे माणुकीचा खरा अर्थ सांगून जात आहेत हेच खरं.