08 August 2020

News Flash

‘गगनयान’च्या पूर्वतयारीसाठी डिसेंबरमध्ये निर्मनुष्य अवकाश मोहीम

मानवी अवकाश मोहिमेसाठी इस्रोने १० टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला.

बेंगळूरु : भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेची पूर्वतयारी म्हणून या वर्षी डिसेंबरमध्ये पहिली निर्मनुष्य अवकाश मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून २०२१ मध्ये होणार आहे. त्यानंतर २०२१ मध्ये भारताचे अवकाशवीर गगनयानातून अवकाशात पाठवले जातील, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली.

‘मानवी अवकाश मोहीम- सध्याची आव्हाने व भविष्यातील स्थिती’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. शिवन यांनी सांगितले की, गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम आहे हे तर खरेच, पण त्यातून भारतीय अवकाश स्थानकाची मुहूर्तमेढही रोवली जाणार आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे. त्यात डिसेंबर २०२० व जून २०२१ मध्ये निर्मनुष्य म्हणजे मानवरहित अवकाश मोहिमा होतील. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये भारताचे अवकाशवीर अंतराळात जातील.

अवकाशात भारतीयांचे अस्तित्व या मोहिमातून सिद्ध होणार आहे. मानवी अवकाश कार्यक्रमाची ही भारतासाठी नवी सुरुवात आहे. गगनयान मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून निवड झालेल्या भारतीय अवकाशवीरांना बेंगळुरू येथील  केंद्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इस्रोची नासा व इतर अवकाश संस्थांशी ते या मोहिमेत कशा पद्धतीने सहभाग देऊ शकतील याविषयी चर्चा सुरू असून त्यांच्या समानव अवकाश मोहिमातून भारतालाही बरेच काही शिकण्यासारखे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

गगनयान मोहिमेतून इस्रोच्या दीर्घकालीन आंतरग्रहीय मोहिमांच्या उद्दिष्टांना पूरक असे काम केले जाणार आहे. मानवी अवकाश मोहिमेसाठी इस्रोने १० टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला असून त्यात अवकाशात वापरण्यास अनुकूल अशा पॅराशूट्सचाही अवकाशवीरांना परत आल्यानंतर उतरवण्यासाठी वापर केला जाणार आहे. या मोहिमेत डीआरडीओ प्रयोगशाळा, भारतीय हवाई दल, सीएसआयआर, इतर राष्ट्रीय प्रयोगशाळा, काही कंपन्या यांची मदत घेतली जात आहे. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकातून संभाव्य अवकाशवीरांची निवड करण्यात आली असून भारतात त्यांचे प्रशिक्षण लवकरच सुरू होईल त्यात सादृश्यीकरण व इतर यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.

मानवरहित गगनयान मोहिमातील ‘व्योममित्र’ यंत्रमानवाशी संवाद

भारताच्या अवकाशवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी व्योममित्र (अवकाशमित्र) नावाच्या स्त्री अर्धयंत्रमानवास (याला पाय नसतात) गगनयानातून पाठवले जाणार आहे. पहिला अवकाशवीर युरी गागारिन याला रशियाने अवकाशात पाठवले त्याआधी इव्हान इव्हानोविच हा यंत्रमानव त्यावेळीही चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. हा स्त्री यंत्रमानव बुधवारी मानवी अवकाश मोहिमांवरील परिसंवादात सादर करण्यात आला. व्योम याचा अर्थ अवकाश असा असल्याने व्योममित्रचा अर्थ अवकाश मित्र असा आहे. या यंत्रमानव महिलेने तिचा परिचय उपस्थितांना करून देताना सांगितले की, मी व्योममित्र, यंत्रमानव, गगनयानच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत मी अवकाश प्रवास करणार आहे. या अवकाश मोहिमेत मी विविध घटकांचे निरीक्षण करून तुम्हाला सतर्क करणार आहे. जीवनपूरक कृतींचे परीक्षण यात केले जाणार आहे. मी अवकाशवीरांशी संभाषण करू शकेन, त्यांना ओळखू शकेन व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकेन.

इस्रो प्रमुख के. शिवन यांनी म्हटले आहे की, ती अर्धयंत्रमानव आहे. माणसाने अवकाशात करण्याच्या कृतींची नक्कल ती करू शकते. सर्व यंत्रणा योग्य आहेत की नाही याची तपासणी करील. डिसेंबर २०२० व जून २०२१ मधील निर्मनुष्य मोहिमात व्योममित्र यंत्रमानवाचा समावेश असणार आहे. हा यंत्रमानव प्रकल्प पूर्ण झाला असून मानवी कृतींचा अवकाशातील अभ्यास आधीच त्याच्या मदतीने केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 12:55 am

Web Title: humanoid joins isro s gaganyaan space mission set for december 2020 zws 70
Next Stories
1 बलात्काराचा आरोप असलेल्या नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस जारी
2 जम्मू-काश्मीर: अवंतिपोराच्या चकमकीत एक दहशतवादी ठार
3 सौदी राजपुत्राकडून जेफ बेझॉस यांचा फोन हॅक?
Just Now!
X