पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिवदेह त्यांच्या गावात, शहरांमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. शहीद जवानांच्या गावात, शहरांमध्ये एक भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या मनात दु:खाबरोबरच पाकिस्तानबद्दल संतापाची भावना आहे.

शहीद जवानांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठया प्रमाणावर नागरिकांची गर्दी केली आहे. अनेक भावनिक क्षण पाहायला मिळत आहेत. लोकांच्या डोळयात अश्रू आहेत. हातात फुले आणि राष्ट्रध्वज घेऊन नागरिक रस्त्याच्या दुर्तफा उभे असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी आहे.

उत्तर प्रदेश उन्नावमधील अजित कुमार आझाद यांचा पार्थिवदेह सकाळी सात वाजता कुटुंबियांनी स्वीकारला. अजित कुमार यांना दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांना ओळखणारा प्रत्येकजण आज त्यांच्या आठवणी जागवत आहे. उन्नावमधून नागरिक मोठया संख्येने अजित कुमार आझाद अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. एकूण ४० जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. सर्व जवानांच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पुलवामाच्या हल्लेखोरांना शासन करणारच असे निक्षून सांगितले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा कधी, कशी, केव्हा, कोण आणि कोणत्या प्रकारे दिली जाईल हे आमचे जवान ठरवतील असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना धैर्य तसंच आपल्या जवानांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.