बँकॉक : लाओसच्या आग्नेयेकडील भागात निर्माणाधीन धरण फुटल्याने आलेल्या जलप्रलयात शेकडो जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने बचावकार्य सुरू केले असून अद्याप पीडितांची नेमकी आकडेवारी समजू शकलेली नाही.

आग्नेय आशियातील लाओस या देशातील अट्टापेऊ प्रांतातील सनमक्षय भागात ४१० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. त्यासाठीचे धरण सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक फुटले आणि त्यातून साधारण ५ अब्ज घन मीटर इतके पाणी वाहून गेले. त्याचा लोंढा खालील सहा गावांमधून वाहत गेला. त्यात ही गावे तेथील रहिवाशांसह वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याच्या मार्गातील गावांमधील अनेक घरे वाहून गेली आहेत. या भागातून हाती आलेल्या छायाचित्रांमध्ये अनेक नागरिक आणि मुले लहान लाकडी होडय़ांच्या आधाराने कसाबसा जीव वाचवताना दिसत होती. पूरग्रस्त प्रदेशात मोबाइल फोनची सेवा विस्कळीत झाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत.

लाओसमध्ये अनेक नद्यांवर धरणे बांधून वीजनिर्मिती केली जाते आणि बहुतांश वीज शेजारील थायलंडला विकली केली जाते. दुर्घटनाग्रस्त प्रकल्पही अशाच प्रकारचा होता. १.२ अब्ज डॉलरच्या या प्रकल्पाचे २०१२ साली काम सुरू झाले होते आणि ते २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यातून निर्माण होणाऱ्या ४१० मेगावॅट विजेपैकी ९० टक्के वीज थायलंडला पुरवली जाणार होती. लाओसची राजधानी व्हिएंटिएनमधील क्षे पियांग क्षे नामनॉय पॉवर कंपनी थायलंडच्या राचाबुरी इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग होल्डिंग आणि दक्षिण कोरियाच्या कोरिया वेस्टर्न पॉवर आणि सरकारी लाओ होल्डिंग स्टेट एंटरप्राइज या कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारत आहे. प्रकल्पांतर्गत हुआय माकचान, क्षे-नामनॉय आणि क्षे-पियान या नद्यांवर धरणे बांधून जलविद्युत निर्मितीची योजना आहे.