सरकार व काँग्रेसमधील चर्चा अपूर्ण
जीएसटी विधेयकासंदर्भातील मतभेद सोडवण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत केलेली चर्चा अपुरी राहिल्यामुळे या विधेयकावरील कोंडी अजूनही कायम आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन संपण्यासाठी मंगळवारपासून फक्त सात दिवस शिल्लक असताना जेटली आणि संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी जीएसटीच्या मुद्दय़ावर तसेच संसदेच्या कामकाजाबाबत चर्चा करण्याकरता राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा आणि मुख्य प्रतोद ज्योतिरादित्य शिंदे यांना आज दुपारी भोजनासाठी आमंत्रित केले होते.
लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे दिल्लीत नसल्याचे कारण सांगून आणखी एक बैठक आयोजित करण्याची मागणी पक्षाने केली आणि आर्थिक सुधारणेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मुद्दय़ावरील तिढा संपवण्यासाठी सरकारने ती लगेच मान्य केली. आजची बोलणी अपुरी राहिली व त्यात काहीही ठोस चर्चा झाली नाही, असे आनंद शर्मा यांनी सांगितले. सरकार आणि विरोधक यांच्यातील चर्चा एका विधेयकापुरती मर्यादित राहू शकत नाही. इतर महत्त्वाची विधेयकेही प्रलंबित असल्यामुळे त्यांनी एकाच विधेयकाबाबत अतिआग्रह धरू नये, असे ते म्हणाले.
यूपीए-२ सरकारच्या कार्यकाळात तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामुळेच जीएसटी विधेयक पाच वर्षे संमत करता आले नाही, असे सांगून त्या वेळी वाणिज्यमंत्री असलेले शर्मा यांनी मोदींना लक्ष्य करण्याची संधी साधली.