21 January 2021

News Flash

‘निवार’ चक्रीवादळाची तमिळनाडूत दहशत

राज्यावरही प्रभाव, पावसाची शक्यता

निवार चक्रीवादळ तमिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकत असून, मंगळवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसामुळे काही भागांत दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले.

 

तमिळनाडू आणि पुडुचेरीला ‘निवार’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केले असून ते तमिळनाडू आणि पुडुचेरी यादरम्यानच्या तटवर्ती क्षेत्रावर गुरुवारी पहाटे आदळण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

सोसाटय़ाचे वारे आणि पावसाने तमिळनाडूच्या अनेक भागांना बुधवारी झोडपून काढले असून प्रशासनाने एक लाखाहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. त्याचप्रमाणे खबरदारीचे उपाय म्हणून अनेक भागांमधील विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी १३ जिल्ह्य़ांमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी गुरुवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महसूलमंत्री आर. बी. उदयकुमार यांनी सांगितले की, एक लाख तीन हजार २९१ जणांना एक हजार मदत केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे. या केंद्रांवर अन्न, पाणी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंसह मुखपट्टय़ाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वीजपुरवठा खंडित

तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा दुपारपासून खंडित करण्यात आला आहे. तटवर्ती जिल्ह्य़ातील वाहतुकीवरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. विमानतळही २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून २६ नोव्हेंबर सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. काही रेल्वे गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. निवार चक्रीवादळ कराइकल आणि मम्मल्लापूरम यादरम्यान बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री धडकणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. चक्रीवादळ चेन्नईपासून २५० कि.मी. अंतरावर, तर पुडुचेरी आणि कड्डलोरपासून अनुक्रमे १९० कि.मी. आणि १८० कि.मी. अंतरावर आहे.या परिसरामध्ये ताशी १२०-१३० कि.मी. वेगाने वारे वाहात असून हा वेग ताशी १४५ कि.मी.वर जाण्याची शक्यता आहे. तमिळनाडूच्या तटवर्ती क्षेत्रात आणि उत्तरेकडील  भागांत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता  आहे.

राज्यावरही प्रभाव, पावसाची शक्यता

पुणे : ‘निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव काही प्रमाणात महाराष्ट्रावरही पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २६ आणि २७ नोव्हेंबरला प्रामुख्याने विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २६ नोव्हेंबरला विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. २७ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात तुरळक भागांत पावसाची शक्यता आहे. २६ आणि २७ नोव्हेंबरला विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 12:14 am

Web Title: hurricane niwar terrorizes tamil nadu abn 97
Next Stories
1 स्कॉटलंडमध्ये ‘सॅनिटरी पॅड्स’ मोफत
2 गर्दीवर नियंत्रण ठेवा!
3 पश्चिम बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावर दगडफेक; १५ दिवसांत दुसरा हल्ला
Just Now!
X