शिष्टमंडळाशी चर्चेस नकार दिल्यामुळे राजनाथ सिंह यांची टीका

हुर्रियतच्या नेत्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळास भेटण्याला दिलेला नकार काश्मिरीयतला अनुसरून नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. फुटीरतावादी हुर्रियत नेत्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला होता. काल हे शिष्टमंडळ राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरला गेले होते.

राजनाथ सिंह म्हणाले, की फुटीरतावाद्यांचे वर्तन काश्मिरीयत, इन्सानियत (मानवता) व जम्हुरीयत (लोकशाही) या कुठल्याच तत्त्वात बसणारे नाही. चर्चेचे दरवाजे सर्वाना खुले आहेत पण पाकिस्तानशी नजीकच्या काळात चर्चा होणार नाही. आधी देशातल्या लोकांशी बोला. शिष्टमंडळातील काही नेत्यांनी हुरियतच्या नेत्यांची व्यक्तिगत पातळीवर भेट घेण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्याला होकार किंवा नकार दिला नव्हता. ज्या नेत्यांनी हुरियत नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला त्यांना वाईट वागणूक मिळाली. याचा अर्थ फुटीरतावाद्यांना काश्मिरीयत व इन्सानियत दोन्ही मान्य नाही. काही नेत्यांनी चर्चेचा प्रयत्न केला पण फुटीरतावाद्यांनी तो हाणून पाडला.

माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी.राजा, जनता दल संयुक्तचे शरद यादव व राजदचे जयप्रकाश नारायण तसेच एआयएमआयएमचे असाउद्दीन ओवैसी यांनी फुटीरतावाद्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. हुरियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी या खासदारांना दरवाजाही उघडला नाही. फुटीरतावाद्यांनी चर्चेत सहभागी व्हावे या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या प्रस्तावाला भाजपचा पाठिंबा होता की नाही यावर काही सांगण्यास राजनाथ सिंह यांनी नकार दिला.

मेहबूबा यांनी फुटीरतावाद्यांना पत्र लिहून प्रस्ताव मांडल्याचे मला माहिती होते, एवढेच राजनाथ सिंह यांनी सांगितले. काश्मीरमध्ये मध्यस्थांचे स्वतंत्र पथक नेमणे व वेगळ्या मार्गाने चर्चा घडवून आणणे याबाबत काही सांगण्यास त्यांनी नकार दिला. काश्मीरवर चर्चेस आमची तयारी आहे पण ती घटनेच्या चौकटीत झाली पाहिजे असे सांगून ते म्हणाले, की जम्मू-काश्मीर हा भारताचा एकात्म भाग असल्याबाबत दुमत असू शकत नाही. आमची दारे व खिडक्या चर्चेसाठी खुल्या आहेत. काश्मीरमधील लोकांना भारतातच राहण्याची इच्छा आहे हे मला माहिती आहे. आमच्या शिष्टमंडळाला जे लोक भेटले, त्यांनी काश्मीरमधील स्थिती सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त केली व ती स्थिती सुधारेल यात शंका नाही. पेलेट गनऐवजी आता आम्ही पावा या घातक नसलेल्या शस्त्रास मान्यता दिली आहे. ती १००० शस्त्रे काश्मीरमध्ये दाखल झाली आहेत. वीस पक्षांचे २६ खासदार काश्मीर भेटीसाठी येतात याचाच अर्थ आम्हाला काश्मीरविषयी गांभीर्य आहे असा होतो.

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानशी चर्चा होणार नाही असे सांगून ते म्हणाले, की हा प्रश्न आम्ही देशाबाहेर जाऊ देणार नाही, आधी देशातच चर्चा करा असे आमचे म्हणणे आहे. संसद ही देशातील सर्वोच्च संस्था आहे व आम्हाला या प्रश्नाचे पुरेसे गांभीर्य आहे. संसदेनेच शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील लोकांच्या वेदना आम्हाला समजतात व त्यासाठी सर्वाचे सहकार्य हवे आहे.

काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीतच

श्रीनगरमध्ये संचारबंदी व काश्मीर खोऱ्यातील इतर भागात र्निबध लागू असून, लागोपाठ ५९व्या दिवशी जनजीवन विस्कळीत झाले. हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी हा ८ जुलैला चकमकीत मारला गेल्यानंतर तेथे संघर्ष सुरू आहे. श्रीनगर शहरात आज सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आधीच संचारबंदी लागू आहे. बाटमालू व मैसुमा भागात आज सकाळी र्निबध लागू करण्यात आले. काश्मीर खोऱ्यात इतरत्र र्निबध लागू असल्याने जनजीवन विस्कळीत आहे. संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. काश्मीर खोऱ्यातील चकमकीत काल किमान २०० जण जखमी झाले. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काश्मीरला काल भेट दिली होती.