ब्रिटीशही म्हणायचे भारताला आझादी मिळणार नाही पण अखेरीस त्यांनाही देश सोडावा लागला होता असे हुरियत कॉन्फरन्सने म्हटले आहे. भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काश्मीरसंबंधी केलेल्या विधानावर हुरियत कॉन्फरन्सने ही प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटीशांनी १०० पेक्षा जास्त वर्ष भारतावर राज्य केले. हजारो भारतीयांची हत्या केली. जालियनवाला बाग हत्यांकाड केले. आजच्या भारतीय सैन्याप्रमाणे त्यावेळच्या ब्रिटीश फौजांनी भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य असेल ते सर्व केले. पण अखेरीस त्यांना लोकांच्या इच्छाशक्तीसमोर झुकावे लागले, देश सोडावा लागला असे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारुख यांनी म्हटले आहे.

दरम्यान भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काश्मीरची आझादीची मागणी कधीच पूर्ण होऊ शकत नाही असे म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रावत म्हणाले, जे लोक काश्मिरमधील तरुणांना बंदूक उचलण्यास प्रोत्साहित करतायेत, हातात बंदूक घेतली तर आझादी मिळेल असं जे सांगतायेत ते तरुणांना भरकटवण्याचं आणि त्यांची माथी भडकवण्याचं काम करत आहेत. मी काश्मिरमधील तरुणांना सांगू इच्छितो की काश्मिरची आझादी कधीच शक्य नाही. तुम्ही हातात शस्त्र उचलून काहीच उपयोग होणार नाही, कारण जो आझादीची मागणी करेल त्याच्याविरोधात आम्ही लढू आणि तुम्ही आमच्याशी (लष्कराशी) लढू शकत नाही. लष्कराशी कोणीही लढू शकत नाही.

चकमकीत मृत्यू झाल्यानंतर आम्हालाही दुःखच होतं, कोणाच्या मृत्यूमुळे आम्हाला काही आनंद होत नाही. पण समोरुन कोणी लढत असेल तर पूर्ण ताकदीने लढण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही. काश्मिरींना समजायला हवं की भारतीय लष्कर इतर देशांएवढं क्रूर नाहीये, पाकिस्तान किंवा सीरियामध्ये अशा घटनांच्यावेळी टॅंक आणि हवाई ताकद वापरली जाते. पण आम्ही नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देतो. काश्मीरच्या तरुणांमध्ये राग आहे हे मी समजू शकतो, पण दगडफेकीने काही साध्य होणार नाही , असं रावत म्हणाले.