जो समाज महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि त्यांच्या सन्मानाचे रक्षण करू शकत नाही, त्या समाजाला सुसंस्कृत म्हणणे उचित नाही, असे मत व्यक्त करून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी दिल्ली सामूहिक बलात्कारच्या घटनेबाबतच्या वेदना व्यक्त केल्या. दिल्लीत १६ डिसेंबर रोजी एका २३ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या पीडित युवतीच्या स्मरणार्थ ‘निर्भया भवन’ उभारण्यात येत असून त्याचा पायाभरणी समारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते मंगळवारी झाला. त्या वेळी राषट्रपतींनी मानवी मूल्यांचा ऱ्हास होत असल्याबद्दल जोरदार ताशेरे ओढले.
महिलांवरील अत्याचार हा केवळ कायदा आणि सुरक्षा दलाचा प्रश्न नाही तर समाजाच्या दृष्टिकोनाचाही प्रश्न आहे. जेव्हा महिलांवर अत्याचार होतात, तेव्हा आजूबाजूचे लोक केवळ सहानुभूती दर्शवून बाजूला होतात आणि हाच मानवी मूल्यांचा ऱ्हास आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
महिलांवरील अत्याचारांकडे पाहता आपल्या सुसंस्कृत मूल्यांचा ऱ्हास झाल्याचे स्पष्ट होते आणि जो समाज महिलेच्या सन्मानाचे रक्षण करू शकत नाही, त्याला सुसंस्कृत समाज म्हणणे उचित नाही, असेही मुखर्जी म्हणाले. महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असून जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीच्या दक्षिण भागातील जसोला येथे पाच मजली ‘निर्भया भवन’ उभारण्यात येणार असून, भविष्यात तेच राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय राहणार आहे.