भारताला लक्ष्य करणाऱ्या जिहादींवर पाकिस्तानने खटले भरावेत, असे माजी राजनैतिक अधिकारी हुसेन हक्कानी यांनी म्हटले आहे. भारतातील हल्ल्यात सामील असलेल्या जिहादी अतिरेक्यांना नजरकैदेत ठेवण्यात येते व प्रत्यक्षात ते खुलेआम हिंडत असतात, भारताविरोधी गरळ ओकत असतात असे ते म्हणाले.

पाकिस्तान जोपर्यंत जिहादींना शिक्षा करीत नाही, तोपर्यंत त्यांना कुणाची भीती वाटेणार नाही, त्यामुळे पठाणकोटसारखे आणखी हल्ले होऊ शकतात. जिहादींवर पाकिस्तानला गेल्या तीस वर्षांत मात करता आलेली नाही, उलट त्यांनी देशाला जास्त यातना दिल्या आहेत असे सांगून पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत असलेल्या हुसेन हक्कानी यांनी सांगितले, की पाकिस्तान भारतापेक्षा लहान आहे, त्यामुळे पारंपरिक लष्करी हल्ल्यात यश येणार नाही हे ओळखून भारतातील शहरांमध्ये हल्ले करून तेथील जनजीवन विस्कळीत करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यातूनच भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू झाल्या.

‘इंडिया व्हर्सेस पाकिस्तान व्हाय काँट वुई जस्ट बी फ्रेंड्स’ या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी एका मुलाखतीत सांगितले, की द्वेषमूलकता हे परराष्ट्र धोरण असू शकत नाही. तरुण पाकिस्तानी व भारतीय लोकांना काय वाटते या दृष्टिकोनातून ‘जगरनॉट’ने प्रकाशित केलेले हे पुस्तक आपण लिहिले.

पठाणकोट हल्ल्याबाबत संयुक्त चौकशी समिती नेमण्याच्या निर्णयातून पाकिस्तानातील नवाझ शरीफ सरकारचा संबंध सुधारण्याचा हेतू दिसून येतो. शिवाय, लष्कराने आंतरराष्ट्रीय दबाव असल्याने संयुक्त चौकशीस मान्यता दिली असाही एक अर्थ होतो, पण जिहादी गटांवर पाकिस्तानने ठोस कारवाई केली नाही तर असे हल्ले भारतात यापुढेही होत राहतील.

भारतातील हल्ल्यांना जबाबदार दहशतवाद्यांना केवळ नजरकैदेत ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर खटले भरून कठोर शिक्षा केली पाहिजे, असे मत मी मुंबई हल्ल्यापासून मांडत आलो आहे व ते आजही कायम आहे असे ते म्हणाले. पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यांचा भारताला हानी पोहोचवण्याचे कमी खर्चाचे साधन म्हणून वापर करीत आहे, पण या हल्ल्यांच्या सूत्रधारांना पाकिस्तानी न्यायालयांनी मोकळे सोडले आहे अशी टीकाही त्यांनी पुस्तकात केली आहे.